पोलिसांच्या आशीर्वादाने सट्टा, गांजाचा व्यवसाय
एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेने चर्चेत आलेले रामबाग परिसरातील टी.बी. वॉर्डचे जीर्ण संकुल परिसर आज ‘क्राइम स्पॉट’ म्हणून ओळखण्यात येते, परंतु या ठिकाणी सदैव कुख्यात गुंडांचे वास्तव्य राहात असून पोलिसांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सट्टा आणि गांजाचा मोठा व्यवसाय चालत असल्याची माहिती समोर येत आहे.
रामबाग परिसर हा अनेक वर्षांपासून गुंडगिरी आणि अवैध धंद्यांसाठी प्रसिद्ध आहे. शहर विकासाकडे वाटचाल करीत असताना या परिसरातील तरुण मात्र सट्टा, अवैध दारूविक्री, गांजा आदी धंद्यांमध्ये गुंतले आहेत. यातील बहुतांश व्यवसाय हे टी.बी. वॉर्डचा परिसरातून चालतात. झुडपी जंगल असल्याने गुंडांना अवैध धंदे करणे सोयीचे होते, परंतु अवैध धंद्यांमुळे गुंडांच्या टोळ्या तयार झाल्या असून आपसी वादातून परिसरात अनेक घटना घडतात. या परिसरातून रामबाग ते वंजारीनगरला जोडणारा एक रस्ता आहे. या परिसरात यापूर्वी अनिल वंजारे (२२) आणि विनोद कुथर या युवकांचा खून करण्यात आला, तर परिसरातून रात्रीच्या सुमारास ये-जा करणाऱ्या महिलांच्या विनयभंगाचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. शिवाय प्रेमीयुगुल या झुडपी जंगलाचा वापर स्वत:ची वासना भागविण्यासाठी करतात. गेल्या २० जुलैला एका बारा वर्षीय विद्यार्थिनीवर या परिसरात अत्याचार करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले होते. प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अहोरात्र परिश्रम घेतले. अखेर पोलिसांना यश आले आणि विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा त्याच भागातील तरुण निघाला. हल्ली ही जागा म्हणजे ‘क्राईम स्पॉट’ अशी ओळख निर्माण झाली आहे.
या भागात राजपूत आणि मेश्राम नावाच्या गुंडांचे अवैध धंदे चालतात. विशेष म्हणजे, दर महिन्याला त्यांची लाखोंची उलाढाल आहे. सट्टा घेण्यासाठी त्यांनी अनेक तरुणांना हाताशी धरले असून ते तरुण दिवसभर टी.बी. वॉर्ड परिसरातच फिरत असतात. त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. विविध घटनांनी चर्चेत असणारे हे स्थळ अतिशय संवेदनशील असतानाही पोलीस परिसरातील गुंडांवर कारवाई करीत नाही. याऊलट घडलेल्या गुन्ह्य़ांचा तपास करण्यासाठी तेथील गुंडांचेच सहकार्य घेतात. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून ते संबंधित गुंडांविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यास धजावत नाहीत, अशी माहिती आहे.
आतातरी कारवाई होणार का?
मावळते पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी गुन्हेगारांना वठणीवर आणून गुन्ह्य़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आणि लोकांमध्ये संवाद निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी पोलीस मित्र ही संकल्पना लागू केली, परंतु इमामवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस मित्रच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने नागरिकांशी संवाद कसा होणार? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. टी.बी. वॉर्ड परिसर संवेदनशील असल्याचे समजल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) कारवाई करून जीर्ण संकुल पाडले आहे. त्यामुळे आता पोलीसही या परिसरात वावरणाऱ्या गुंडांवर कारवाई करतील का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

पेट्रोलिंगमध्ये वाढ
रामबाग परिसरात पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच इमामवाडा पोलीस ठाण्यातील दिवसरात्रीच्या ठाणा अधिकाऱ्यांनी परिसरात एकदा पेट्रोलिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मेडिकलच्या अधिष्ठात्यांना परिसरातील रस्ते बंद करण्यास सांगण्यात आले आहे. या ठिकाणी गुंडांचा वावर रोखण्यासाठी संशयास्पद व्यक्तींची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
– जी. श्रीधर,  पोलीस उपायुक्त परिमंडळ-४