राज्यसभा सदस्य आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) नेते रामदास आठवले यांना संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यापासून समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी रोखले आणि त्यांना धक्काबुकी केली. सीताबर्डी पोलिसांनी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, पण आठवले यांनी पुष्पहार न घातला सभेला संबोधित केले.

आरपीआयने आयोजित केलेली भारत भीम यात्रा मंगळवारी नागपुरात पोहोचली. त्यानिमित्ताने संविधान चौकात साडेआठ वाजता सभा आयोजित करण्यात आली होती. आठवले हे सभेपूर्वी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यास गेले असता पुतळ्याच्या सभोवताल असलेल्या समता सैनिक दलाच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. आठवले हे दलितांसाठी काही करू शकत नाही. ते भाजप समर्थित आहे, अशा घोषणा त्यांनी दिल्या. आठवले यांच्या समर्थकांनी त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला असता आठवले यांना धक्काबुकी झाली. पोलिसांनी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचा विरोध बघता आठवले सभा मंडपाकडे गेले. त्यांच्या वतीने बाळू घरडे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला.