07 March 2021

News Flash

काळे धन परत आणण्यासाठी कठोर पावले उचला!

मोदी सरकारवर टीका करणे टाळले

योगगुरु रामदेव बाबा

रामदेवबाबांचे प्रतिपादन; मोदी सरकारवर टीका करणे टाळले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीचे कौतुक करताना योगगुरू रामदेवबाबांनी त्यांना परदेशातून काळे धन परत आणण्याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज असल्याची सूचना केली आहे. आपली वाईट बघण्याची दृष्टी कमी झाली, असे सांगून त्यांनी मोदींच्या चुकीच्या धोरणावर बोलणे टाळले.

नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे रविवारी आयोजित ‘वार्तालाप’ कार्यक्रमात ते बोलत होते. परदेशातील काळा पैसा आणण्याबाबत मोदी सरकार काम करीत आहे. मात्र, हा प्रश्न जटिल आहे, त्यामुळे तो सोडवण्यासाठी परिणामकारक आणि यात बदल घडतील, यादृष्टीने जास्त कठोर पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. सरकारने तसे केले नाही, तर पुढे पाहू.

पंतप्रधान मोदी यांच्या कामगिरीविषयी विचारल्यावर ते म्हणाले की, कोणत्याही पंतप्रधानांच्या कामाचे मूल्यपामन, देशाची अंतर्गत व बाह्य़ सुरक्षा, योग्य धोरण ठरवून त्याची अंमलबजावणी करणे आणि देशाची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढविणे, या तीन मुद्दय़ांवर केले जाते. आतापर्यंतची मोदींची कारकीर्द समाधानकारक राहिलेली आहे. ते स्वत: १८-१८ तास काम करतात. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षा खूप आहेत. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद कराव्यात, या मागणीवर आपण ठाम आहोत. मधल्या काळात रिझव्‍‌र्ह बँकेने सरकारला परवानगी मागितली होती. आपण यासंदर्भात अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन अशी परवानगी देऊ नये, अशी विनंती केली, असे त्यांनी सांगितले.

वैदिक शिक्षण मंडळावर ठाम

देशात वैदिक शिक्षण मंडळ स्थापन करावे, यासंदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिला होता. त्यावर दोन वर्षांपासून मंथन सुरू आहे. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही इच्छा आहे.

निम्म्या किमतीत जमीन देण्याची तयारी

नागपूरच्या फूडपार्कसाठी पतंजलीला सवलतीच्या दरात जमीन दिल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. आपल्याला सरकारने ज्या किमतीत सरकारने जमीन दिली तीच जमीन त्यापेक्षा निम्म्या किमतीत इतर कंपन्यांना विशेषत: बहुराष्ट्रीय कंपन्यांना देण्यास आपण तयार आहोत. त्यांनी प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शवावी, असे प्रतिआव्हानही त्यांनी दिले. राजकीय पक्षांनी आपल्यावर टीका करावी, परंतु विदर्भाच्या विकासाआड त्यांनी येऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 12:54 am

Web Title: ramdev baba comment on black money
Next Stories
1 आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे झटपट निर्णय!
2 मिहानमध्ये सहा महिन्यांत फूड पार्क,
3 ब्रम्हपुरीच्या जंगलात सापडलेल्या बछडय़ाचा अखेर मृत्यू
Just Now!
X