मागील पाच वर्षांत नागपूर अधिवेशन म्हटले की  मुख्यमंत्र्यांचा मुक्काम ‘रामगिरी’वर ठरलेला, यंदा येथे प्रथमच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मुक्काम असणार आहे. उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेल्या ‘देवगिरी’वर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील किंवा छगन भुजबळ यांच्यापैकी कोणाचा मुक्काम राहतो,  याबाबत उत्सुकता आहे.

येत्या १६ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. नागपुरातील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’ आणि उपमुख्यमंत्र्याचे ‘देवगिरी’ या दोन बंगल्यांची चर्चा अधिक होते. मागील पाच वर्षे नागपूरकर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून रामगिरीवर मुक्काम राहात होता. एरव्ही सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा अपवाद सोडला तर सर्वसामान्य नागरिक या बंगल्याकडे अधिवेशन काळात फिरकत नसे. पण देवेंद्र फडणवीस  मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना भेटण्यासाठी सर्वसामान्य नागपूरकर बहुसंख्येने येथे येत होते. अधिवेशन नसतानाही फडणवीस नागपूर दौऱ्यावर आले की त्यांना रामगिरीवर भेटणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे या बंगल्याविषयी स्थानिक नागपूरकरांच्या मनात एकप्रकारची जवळीक निर्माण झाली होती.

राज्यातील सत्ताबदलानंतर मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले. त्यामुळे या अधिवेशनात ‘रामगिरी’वर त्यांचा मुक्काम असेल. उद्धव ठाकरे यापूर्वी अनेक वेळा नागपूरला आले आहेत. त्यावेळी त्यांच्या थांबण्याची व्यवस्था येथील हॉटेलमध्येच केली जात असे. यावेळी ते प्रथमच मुख्यमंत्री म्हणून नागपूरमध्ये येत असून त्यांचा मुक्काम रामगिरीवर राहणार आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी नागपूर व विदर्भातील शिवसैनिक येथे गर्दी करण्याची शक्यता आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी येथे आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा सज्ज करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या देवगिरी बंगल्यावर यावेळी कोण थांबणार याचीही उत्सुकता आहे. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सहा ज्येष्ठ मंत्र्यांपैकी कोणाही उपमुख्यमंत्री नाही. छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री असताना देवगिरीवर थांबले आहे. त्यामुळे ते या बंगल्यासाठी आग्रही असू शकतात. उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याही नावांची चर्चा आहे. त्यामुळे त्यांना या बंगल्यावर मुक्काम करण्याची संधी मिळू शकते.

सचिवालयाचे काम उद्यापासून

विधिमंडळ सचिवालयाचे मुंबई येथील कार्यालयातील कामकाज ५ डिसेंबर रोजी बंद झाले. शनिवारी ७ डिसेंबरपासून ते नागपूर येथे सुरू होणार आहे. अधिवेशनासाठी हे कार्यालय नागपूर येथे हलवण्यात येते हे येथे उल्लेखनीय. सचिवालयाचे काही कर्मचारी नागपूरमध्ये दाखल झाले आहे.