नागपूर : विद्यमान आमदार आपला असूनही युती धर्म पाळण्यासाठी भाजप रामटेक मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडणार काय आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार कोण असेल, हे या मतदारसंघात बघणे उत्सुक्याचे ठरणार आहे.

ओबीसीबहुल असलेल्या रामटेक मतदारसंघात भाजपने शिवेसेनेविरुद्ध  गेल्यावेळेस विजय संपादन केला होता. या मतदारसंघात अनुसूचित जाती आणि आदिवासींची संख्याही बऱ्यापैकी आहे. मात्र, येथे काँग्रेसनंतर शिवसेनेने वर्चस्व दाखवले आहे. गेल्या निवडणुकीत भाजप-शिवेसनेची युती नसल्याने दोन्ही पक्षांनी आपआपले उमेदवार उभे केले आणि भाजपचे मल्लीकार्जुन रेड्डी यांची लॉटरी लागली. आशीष जयस्वाल पडले त्यामुळे शिवसेनाचा बुरुज ढासळला. काँग्रेसला मराठा समजाचा उमेदवार देऊन तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. परंतु यावेळी पुन्हा राज्यात सत्ता स्थापन्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे. त्यामुळे युती आवश्यक आहे. त्यासाठी ते रामटेकच्या जागेवर पाणी सोडण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत शिवेसेनेकडून प्रबळ दावेदार असलेले माजी आमदार अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजकडून योगेश कुंभलकर, विजय हटवार, अविनाश खडतकर हे इच्छुक आहेत. तर शिवेसनाचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने माजी खासदार प्रकाश जाधव यांचीही दावेदारी आहे.

दुसरीकडे काँग्रेसकडून माजी मंत्री व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांचे रामटेकसाठी प्रयत्न सुरू आहेत. उमरेड विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर ते नव्या मतदारसंघाच्या शोधात आहेत. गेल्यावेळी ते कामठीतून मैदानात उतरले, परंतु त्यांना तेथे फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून रामटेकवर लक्ष केंद्रित केले आहे. ते या मतदार संघाच्या अनेक खेडय़ापाडय़ात सातत्याने जनसंपर्क ठेवून आहेत. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रसेकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नात असलेल्या चंद्रपाल चौकसे यांनी यावेळीदेखील पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. तसेच गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामटेकमधून लढलेले डॉ. अमोल देशमुख हे देखील इच्छुक आहेत.

रामटेक विधानसभा २०१४

नाव                                               मिळालेली मते

मल्लीकार्जुन रेड्डी                         भाजप  ५९,३४३

अ‍ॅड. आशिष जयस्वाल                  शिवसेना ४७,२६२

सुबोध मोहिते                                 काँग्रेस ३५,५४६

रामटेक लोकसभा निवडणूक २०१९

नाव                             मिळालेली मते

कृपाल तुमाने            शिवसेना ५,९७,१२६

किशोर गजभिये          ४,७०,३४३