07 August 2020

News Flash

रामटेकची जागा डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेत ‘राजकारण’!

मुलाच्या आडून सतीश चतुर्वेदी यांचा डाव

मुलाच्या आडून सतीश चतुर्वेदी यांचा डाव

मंगेश राऊत, लोकसत्ता

नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघाचे आरक्षण निघणार असून ते सामान्य प्रवर्गासाठी खुले होणार आहे. त्यामुळे या जागेवर डोळा ठेवून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी हे त्यांचे चिरंजीव व शिवसेनेचे विधान परिषद आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्यामागून ‘राजकारण’ करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीतील शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला वेगळे महत्त्व आले आहे. आजवर येथील शहरप्रमुख पदाला फारसे महत्त्व नव्हते. पण, माजी खासदार प्रकाश जाधव यांच्याकडे पक्षाने पुन्हा एकदा शहराची जबाबदारी सोपवली. त्यानंतर काही महिन्यांत  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले व उपराजधानीतील शिवसेना शहर प्रमुख पदाला महत्त्व प्राप्त झाले. तिकडे पंधरा वष्रे राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणारे सतीश चतुर्वेदी हेही अचानक पक्षाबाहेर फेकले गेले. काँग्रेसमध्ये त्यांचे पुनर्वसन होण्याची चिन्हे नसताना व राजकारणाच्या पटलावरून चतुर्वेदी कुटुंबीयांचे नाव पुसले जाईल, अशी अवस्था असताना त्यांच्या मुलाने शिवसेनेत प्रवेश केला. यवतमाळमधून विधानपरिषद निवडणूक लढवली व पुन्हा एकदा चतुर्वेदी कुटुंबातील सदस्य विधिमंडळाच्या वरच्या सभागृहात पोहाचला. या निवडणुकीमुळे चतुर्वेदी घराण्याला नवसंजीवनी मिळाली. आता २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघाचे आरक्षण काढले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. ही चर्चा कानावर पोहोचताच सतीश चतुर्वेदींच्या आतमधील राजकारणी जागा झाला व मुलाच्या माध्यमातून शहरातील शिवसेनेला अस्थिर करण्याचा डाव आखला गेल्याची चर्चा आहे. शहर शिवसेनेची धुरा चतुर्वेदी कुटुंबीयांच्या हाती आल्यास २०२४ मध्ये रामटेकसाठी ते दावा करतील, असेही शिवसेनेच्या गोटात बोलले जात आहे.

.. तर थेट शिवसेनेतच प्रवेश?

प्रकाश जाधव हे रामटेकचे माजी खासदार आहेत. आरक्षण हटल्यास पहिला दावा त्यांचा असेल. पण, शहर प्रमुखपदावरून ते हटल्यास व नेतृत्व दुष्यंत चतुर्वेदींकडे आल्यास सतीश चतुर्वेदी हे शिवसेनेत प्रवेश करतील व रामटेकसाठी दावा करतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यासंदर्भात सतीश चतुर्वेदी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही. शहरप्रमुख प्रकाश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुंबईतील वरिष्ठ या विषयावर बोलतील. आपण कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असे सांगितले.

तिकिटावर डोळा ठेवणारे यशस्वी होणार नाहीत

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे आरक्षण हटणार आहे किंवा नाही, हे प्रथम तपासावे लागेल. पण, आरक्षण हटले या व जागेवर डोळा ठेवून कोणी शिवसेनेत प्रवेश केला तरी त्याचा विचार करण्यात येणार नाही. प्रथम जुन्या लोकांचा विचार केला जाईल.

– गजानन कीर्तीकर,खासदार, शिवसेना.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 4:03 am

Web Title: ramtek lok sabha constituency shiv sena legislative council mla dushyant chaturvedi satish chaturvedi zws 70
Next Stories
1 करोना युद्धात बंदी घातलेल्या प्लास्टिकचा सर्रास वापर
2 मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रेल्वे मार्ग विस्तारावरून वाद
3 रक्तद्रव दात्यांना शासनाकडून आर्थिक प्रोत्साहन
Just Now!
X