सीताबर्डीतील ऑटोरिक्षाचालकांबाबत प्रश्नचिन्ह

सीताबर्डीसारख्या गर्दीच्या परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे ऑटोचालकाने अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने पुन्हा एकदा सीताबर्डीतील ऑटोचालकांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. या वर्षांत आतापर्यंत ऑटोचालकाकडून घडलेली ही तिसरी बलात्काराची घटना आहे.

रवि उके असे आरोपी ऑटोचालकाचे नाव असून त्याच्याविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी मध्यप्रदेशातील चिखलाबाद-बालाघाट येथील रहिवासी आहे. तिचे आईवडील नागपुरात निर्माणाधीन इमारतीवर बांधकाम मजूर आहेत. गेल्या १० सप्टेंबरला ती आईवडिलांना भेटण्यासाठी नागपूरला आली होती. तिला इसासनीकडे जाणारा रस्ता माहीत नव्हता. त्यामुळे तिने आरोपी ऑटोचालकाला विचारणा केली. त्याने इसासनीला पोहोचवून देण्याचे आमिष दाखवले. रात्री नऊ  वाजताच्या सुमारास त्यांनी एका रेस्टॉरेंटमध्ये नाश्ता केला. दरम्यान, ऑटो डांबरी रस्ता सोडून जंगलाच्या रस्त्याने जात होता. तिने विचारणा केली असता शॉर्टकट असल्याचे सांगून जंगलात घेऊन गेला. तिला ऑटोतून उतरण्यास सांगितले. त्यानंतर चाकूच्या धाकावर तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या तावडीतून सुटल्यानंतर ती अर्धनग्नवस्थेत पळू लागली. रस्त्यावर वाहनचालकाला ती दिसली. त्याने पोलिसांना माहिती दिली. आरोपीचा शोध सुरू आहे.

पीडिता सुधारगृहात

गेल्या पाच दिवसांपासून पीडित मुलगी बेपत्ता आहे. तिच्या आईवडिलांचा अद्याप पत्ता लागलेला नसून पोलिसांनी तिला तिच्या नातेवाईकांकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईक तिला ठेवायला तयार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी तिला महिला सुधारगृहात दाखल केले.

पोलिसाकडून अत्याचाराचा प्रयत्न

एका पोलीस कर्मचाऱ्याने घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सदर पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. या प्रकरणात आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जॉर्ज पार्कल (४०)  रा. तीन मुंडी चौक, सदर असे आरोपीचे नाव असून तो एएनओमध्ये हवालदार आहे. सध्या प्रतिनियुक्तीवर पोलीस मुख्यालयात तैनात असून एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे टपाल बुलेट रायडर म्हणून तैनात आहे. रविवारी रात्री घरी कोणी नसताना जॉर्ज यांनी  मोलकरणीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केल्याने त्याने तिला सोडून दिले.