वाडी पोलीस ठाण्यातील प्रकरण

नागपूर : वाडी पोलीस ठाण्यातील दुय्यम पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांच्याविरुद्ध अखेर महिनाभराने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी त्यांनी यापूर्वीच सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला आहे.

वर्षभरापूर्वी जाधव हे कामावर हजर असताना एक मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार घेऊन काही लोक पोलीस ठाण्यात गेले होते. पोलिसांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार घेतली. तेव्हा फिर्यादीसोबत एक ३२ वर्षीय तरुणी हजर होती. तक्रार नोंदवून घेताना तरुणीची ओळख  जाधव यांच्याशी झाली. त्यांनी एकमेकांना आपापले मोबाईल क्रमांक दिले. त्यानंतर दोघांमध्ये संदेश, व्हॉट्स अ‍ॅप करणे सुरू झाले. त्यातून मैत्री व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पीडित तरुणी अविवाहित असल्याने आईवडिलांसोबत राहायची. पण, पोलीस निरीक्षकांशी प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर ती ‘लिव्ह इन’मध्ये राहायला तयार झाली. त्यांनी अमरावती मार्गावर एका ठिकाणी खोली भाडय़ाने घेतली. पती-पत्नीसारखे राहू लागले. जाधवने तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले व नंतर नकार दिला. त्यामुळे तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली, परंतु वाडी पोलिसांनी काहीच कारवाई न केल्याने तरुणीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. आयुक्तांनी उपायुक्त विवेक मासाळा यांना चौकशी करण्यास सांगितले. त्यानंतर एमआयडीसीच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून चौकशी सुरू झाली. सहाय्यक आयुक्तांनी जाधव यांना चौकशीसाठी बोलावले असता त्यांनी गुन्हा दाखल करून अटक होण्याची भीतीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने जामीनही मंजूर केला. अखेर पोलिसांनी चौकशी पूर्ण करून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्य़ानंतर पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.