शहरातील पालक वर्गात संताप; पोलीस आयुक्तांनीही गंभीर दखल घेतली

नागपूर : मैदानात खेळणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना घरी सोडून देतो, अशी थाप मारून एका नराधमाने रात्रीच्या अंधारात चाकूच्या धाकाने त्यांच्यावर बलात्कार केला. हा निंदनीय प्रकार लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री घडला.

रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुली सुरक्षित राहिल्या नसल्याच्या भावनेने पालक वर्गात संतप्त भावना व्यक्त होत असून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. सहा वर्षे व चार वर्षे वयाच्या दोन चिमुकल्या मुली २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी खेळायला गेल्या होत्या. दरम्यान एका नराधमाने त्यांना घरी सोडून देतो असे म्हटले. मोठय़ा मुलीने नकार दिला. या नराधमाने लहान मुलीस कडेवर घेऊ न लाडीगोडी लावली व झुडपी जंगलात नेऊन त्यांच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलींना रस्त्यावर सोडून पळून गेला. अंधारात मुलींना घराची वाट सापडत नसल्याने त्या फिरत होत्या. ही बाब परिसरातील मजुरांच्या लक्षात आली. त्यांनी मुलींना घराचा पत्ता विचारला व घरी नेऊ न दिले. त्यांच्या आईवडिलांनी मुलींना घेऊन मेयो रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी मुलींची वैद्यकीय तपासणी व उपचार केले. त्यावेळी मुलींवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी मेयोतील पोलीस चौकीला घटनेची माहिती दिली. यानंतर लकडगंज पोलिसांना बोलावण्यात आले. लकडगंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यासंदर्भात लकडगंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल.

झोपडपट्टी परिसरात जनजागृती करा

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेतील आरोपीला तत्काळ शोधून शिक्षा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्यानंतर काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून आरोपीची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनोळखी इसमांसोबत लहान मुलींना न पाठवणे किंवा लहान मुलांनी न जाण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती करण्याची मोहीम हाती घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. यात भरोसा सेलसह सर्व पोलीस ठाण्यांनी शहरातील झोपडपट्टी परिसरात फिरून जनजागृती करावी, दहा दिवसांत हे कार्य पूर्ण करावे, असेही आयुक्तांनी बजावले आहे.