News Flash

टीव्ही, फास्ट फूडमुळे वेगाने वाढतोय लठ्ठपणा

लठ्ठ मुलांसह  लठ्ठ होण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांच्या इतिहासात बरीच धक्कादायक माहिती पुढे आली.

टीव्ही, फास्ट फूडमुळे वेगाने वाढतोय लठ्ठपणा
(संग्रहित छायाचित्र)

दोन शाळांच्या अभ्यासात ७.१ टक्के मुले लठ्ठ आढळली; १३.५ टक्के मुले लठ्ठपणाच्या उंबरठय़ावर

उपराजधानीतील ‘सीबीएसई’ संवर्गातील दोन शाळांमध्ये झालेल्या एका अभ्यासात  ७.१ टक्के मुले लठ्ठ असल्याचे, तर १३.५ टक्के मुले लठ्ठपणाच्या उंबरठय़ावर असल्याचे समोर आले. १० ते १२ वयोगटातील या मुलांमध्ये वेगाने वाढणाऱ्या लठ्ठपणाला जास्त वेळ टीव्ही बघणे, फास्ट फूड सेवनासह इतरही बरीच कारणे जबाबदार असल्याचा निष्कर्षही या अभ्यासातून काढण्यात आला.

डायबेटिज केअर फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या (डीसीआरसी) नागपूर शाखेने उपराजधानीत सीबीएसई शाळेतील पाचवी ते सातवीतील १० ते १२ वर्षांच्या मुलांची तपासणी केली. यावेळी दोन सीबीएसई शाळेतील एकूण १,०१० मुलांचे वजन, उंची, बॉडी मास इंडेक्ससह काही वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या. त्यात ५९० (५८ टक्के) मुले तर ४२० (५२ टक्के) मुलींचा समावेश होता. दोन्ही शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी ७.१ टक्के जणांना लठ्ठपणा असल्याचे आढळले. दोन्ही शाळेत उंची व वयाच्या तुलनेत थोडे वजन जास्त असणे व पुढे लठ्ठपणा होण्याची शक्यता असलेले  १३.५ टक्के विद्यार्थी आढळले.

लठ्ठ मुलांसह  लठ्ठ होण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांच्या इतिहासात बरीच धक्कादायक माहिती पुढे आली. त्यानुसार या मुलांना त्यांच्या पालकांकडून तेल, तूप, फास्ट फूड, जंक फूड जास्त प्रमाणात दिले जात होते.

या मुलांचे मैदानी खेळ कमी झाले असून ते बैठे पद्धतीचेच व्हिडिओगेम, मोबाईलवरील खेळांसह इतर खेळ जास्त खेळत असल्याचे पुढे आले. या मुलांपैकी ६५ टक्के मुले एक तासाहून जास्त टीव्ही रोज बघत असल्याचे लक्षात आले.

या मुलांना लठ्ठपणातून बाहेर काढणे शक्य आहे, परंतु त्यासाठी पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष देण्याची  गरज आहे.

पुरुष गटात लठ्ठपणा जास्त

‘डीसीआरसी’च्या अभ्यासात ७.१ टक्के लठ्ठ बालकांमध्ये मुलींची संख्या २.४ टक्के तर मुलांची संख्या सर्वाधिक १०.३ टक्के आढळली. लठ्ठपणाच्या उंबरठय़ावरील १३.५ टक्के बालकांपैकी १९.८ टक्के मुले तर ४.५ टक्के मुली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुरुष गटात लठ्ठपणाची शक्यता जास्त राहत असल्याचे समोर आले आहे.

मुलींचे वजन कमी

या अभ्यासात १२.७ टक्के बालके ही वय आणि उंचीच्या तुलनेत कमी वजनाची आढळली. त्यात ९.२ टक्के मुले तर १७.६ टक्के मुलींचा समावेश आहे. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत मुलींचे वजन कमी असल्याचे पुढे आले आहे.

कमी वजनाच्या बालकांना सर्वाधिक जोखीम

वैद्यकीय दृष्टीने जन्माच्यावेळी अडीच ते साडेतीन किलो वजनाची बालके सामान्य गटात मोडतात, परंतु त्याहून कमी वजनाची मुले भविष्यात लठ्ठ होण्याची जोखीम असते, असे या अभ्यासात पुढे आले आहे. कमी वजन असेल तर  त्यांच्या शरीरात कमी असलेले विविध घटक मिळवण्यासाठी विशिष्ट बदल होतात. त्यामुळे या बालकांमध्ये लवकर वजन वाढण्याबाबतची विशिष्ट प्रक्रिया विकसित होते. त्यामुळे ही मुले पुढे लठ्ठ होण्याची शक्यता असते.

जन्माच्यावेळी जास्त वजनही योग्य नाही

जास्त वजनाची मुले जन्मतात ही चांगली बाब असल्याचा अनेकांचा समज आहे, परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. जास्त वजनाची मुले जन्मने योग्य नसून त्यांना भविष्यात लठ्ठपणाची सर्वाधिक जोखीम असते. लठ्ठपणामुळे पुढे या मुलांना मधुमेह, उच्च रक्तदाबासह इतरही आजार होऊ शकतात.

– डॉ. सुनील गुप्ता, डायबेटिज केअर फाऊंडेशन ऑफ इंडिया

लठ्ठपणा टाळण्यासाठी हे करा

* मैदानी खेळ वाढवणे

* फास्ट फूडसह

* खानपानावर नियंत्रण

* टीव्ही, मोबाईलपासून दूर राहणे

* हिरव्या भाज्यांसह मोसमी फळांचे सेवन

* व्यायाम करणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 2:56 am

Web Title: rapidly growing obesity due to fast food tv
Next Stories
1 सत्काराआडून पटोलेंच्या दावेदारीला बळ!
2 बंदी असतानाही श्रींच्या सजावटीत थर्माकोलचा वापर
3 देशातील ८० स्मार्ट सिटींमध्ये पाण्याचे ‘नागपूर मॉडेल’
Just Now!
X