विषबाधा झाल्याचा संशय

राप्ती एक्सप्रेसने प्रवास करीत असलेल्या २० पेक्षा अधिक प्रवाशांना अचानक उलटी आणि हगवण सुरू झाल्याने रेल्वे प्रशासनांची तारांबळ उडाली. नागपूर रेल्वेस्थानकावर ही गाडी गुरुवारी आल्यानंतर प्रवाशांवर उपचार करण्यात आला.

त्रिवेंद्रम- गोरखपूर राप्तीसागर एक्सप्रेस त्रिवेंद्रमवरून निघाली होती. प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनातर्फे खाद्यपदार्थाचे नमुने घेण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर नेमकी स्थिती कळू शकणार आहे. या घटनेमुळे रेल्वे गाडीत मिळणाऱ्या अन्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तसेच अवैध खाद्यविक्रेत्यांवर अंकुश घालण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

या गाडीत  रात्री ९ वाजताच्या सुमारास प्रवाशांनी जेवण घेतले. मध्यरात्रीनंतर या प्रवाशांना उलटी व हगवणीचा त्रास सुरू झाला. एस-२ ते ए-११  या बोगीतील जवळपास २० पेक्षा अधिक प्रवाशांना हा त्रास सुरू होता.

नागपूर स्थानकावर गाडी येताच रेल्वेच्या तीन डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केला. पेंट्री कारमधील खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतरच हा त्रास सुरू झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे होते.