राज्यातील दर्शन पक्षीप्रेमींसाठी आनंददायी

पृथ्वीच्या अध्र्या भागात प्रवास करणारा आणि दर्शनासाठी दुर्मीळ समजल्या जाणारा ‘सोन टिटवा’ हा पक्षी नुकताच अमरावती जिल्ह्य़ातील छत्री तलावावर दिसून आला. पॅसिफिक महासागर ओलांडून येणारा हा पक्षी दुर्मीळ असून, हिवाळयातील त्याचे स्थलांतरण अर्धी पृथ्वी व्यापणारे आहे. यापूर्वी याची नोंद महाराष्ट्राची किनारपट्टी, केरळ, गुजरात, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीसह मेघालय, सिक्कीम येथे करण्यात आली आहे. महाराष्ट्र पठारावर मात्र याचे दुर्लभ दर्शन पक्षीप्रेमींना आनंद देणारे ठरले आहे.

‘सोन टिटवा’ या पक्ष्याला इंग्रजी भाषेत ‘पॅसिफिक गोल्डन प्लोवर’ म्हणतात. शास्त्रीय भाषेत याला ‘प्लुवीयालीस फुल्वा’ असे नामाभिधान असून हा ‘क्याऱ्याड्रीडी’ कुळातील पक्षी आहे. ‘तितर’ पक्ष्याएवढा त्याचा असून तो २३ ते २६ से.मी. असतो. जाड डोके, काटकुळे पाय व कबुतरासारखी चोच असून खालून पांढरा व वरून ठिपके असतात. विणीच्या हंगामात वरच्या बाजूने खास सोनेरी ठिपके असतात, म्हणून याला ‘सोन टिटवा’ या नावाने ओळखले जाते. नर-मादी दिसायला सारखेच असतात. बरेचदा थव्याने आढळून येतात. अमरावती येथे वन्यजीव छायाचित्रकार मनोज बिंड, वैभव दलाल, धनंजय भांबूरकर, प्रफुल्ल गावंडे पाटील, सुरेश खांडेकर व वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांना पक्षीनिरीक्षणादरम्यान तो एकटाच दिसून आला.

पाणथळ जागा, चिखलाणीचा भाग, गवताळ प्रदेश तसेच समुद्र किनारपट्टीचा प्रदेश सोन टिटव्याचा अधिवास आहे. भारत, नेपाळ, श्रीलंका या देशात हा हिवाळयाच्या मोसमात स्थलांतर करून येतो. टुंड्रा प्रदेश, अलास्का, सायबेरिया या प्रदेशासह उत्तर अमेरिका हा याचा विणीचा प्रदेश आहे. या पक्ष्याचे दर्शन अतिदुर्मीळ आहे.

‘सोन टिटवा’ हा पक्षी आणखी पाच-सहा दिवस या ठिकाणी वास्तव्य करेल आणि त्यानंतर तो पुढच्या प्रवासाला निघेल, असा अंदाज यादव तरटे पाटील यांनी व्यक्त केला आहे. या पक्ष्याची कुणीतरी, कधीतरी नोंद केली आहे, पण त्याचा अहवाल उपलब्ध नाही. पक्षीनिरीक्षक तसेच वन्यजीव छायाचित्रकारांनी सर्व पक्ष्यांच्या नोंदी व निरीक्षणे नियमित त्यांच्या दैनंदिनीत लिहून ठेवावीत. यामुळे संशोधन, संवर्धन व जनजागृतीसाठी नक्कीच उपयोग होईल, असे तरटे पाटील यांनी सांगितले.