News Flash

कोणतीही जखम नसताना गुडघ्यातून पाणी निघतेय

मेडिकलमध्ये दुर्मिळ आजाराचा रुग्ण

कोणतीही जखम नसताना गुडघ्यातून पाणी निघतेय
(संग्रहित छायाचित्र)

मेडिकलमध्ये दुर्मिळ आजाराचा रुग्ण

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल)  डाव्या गुडघ्यातून पाण्यासदृश्य स्राव होत असलेला बालक उपचाराला आला आहे. तो यवतमाळ जिल्ह्य़ातला असून त्याचा आजार बघून येथील वरिष्ठ डॉक्टरांनाही आश्चर्यचा धक्का बसला. याबाबत जगभऱ्यातील वैद्यकीय जर्नलमधून माहिती घेण्याचे प्रयत्न केले जात आहे.

आर्यन वाघाडे (११) रा. पिंपड्र, पो. स्टे. मुकुटबन, ता. झरी, जि. यवतमाळ असे मुलाचे नाव आहे. तो सहावीत शिकत असून त्याचे वडील शिक्षक आहेत. दहा महिन्यापूर्वी आर्यन सायकल चालवत होता. एकदा तो पडला. उपचार घेतल्यावर तो बरा झाला. पंधरा दिवसानंतर त्याच्या पायातील डाव्या गुडघ्यातून पाण्यासदृश्य स्राव सुरू झाला. हा स्राव कधी दोन मिनिटे, कधी जास्त काळापर्यंत सुरू राहतो.  गुडघ्यावर कोणतीच जखम नसताना स्राव निघतो कसा? हा प्रश्न पालकांना पडला होता.

पालकांनी मुलाला स्थानिक डॉक्टरांसह यवतमाळ, सोलापूर, नागपूरच्या सुमारे १५ तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवले. हा प्रकार पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी इतर डॉक्टरांकडून उपचाराचा सल्ला दिला. दरम्यान, मंगळवारी मुलगा पालकांसह मेडिकलमध्ये आला. अस्थिरोग विभागाच्या डॉक्टरांनी मुलाच्या पायातून स्राव होत असतानाचा व्हीडिओ बघितल्यावर त्यांनाही धक्काच बसला. या मुलाचे एक्सरे, सीटी स्कॅनसह इतरही काही तपासण्या केल्या. परंतु स्राव होतो कुठून? हे स्पष्ट झाले नाही. शेवटी या आजाराबाबत जगभरातील वैद्यकीय जर्नलमध्ये काही आढळते काय? याचा शोध डॉक्टरांकडून सुरू झाला आहे.

‘‘पायावर जखम नसताना पाणीसदृश्य स्राव होणे आणि विविध तपासण्या केल्यावरही त्यात काहीही स्पष्ट न होणे हा प्रकार प्रथमच बघितला. याबाबत अस्थिरोग विभागाचे तज्ज्ञ डॉ. सजल मित्रा यांचा सल्ला घेण्यात आला तसेच वैद्यकीय जर्नलमध्येही काही आढळते का? याचा शोध घेतला जात आहे. मुलावर उपचार करण्याचे प्रयत्न सुरू आहे’’

– प्रा. डॉ. फैजल, अस्थीरोग तज्ज्ञ, ट्रामा केयर सेंटर, नागपूर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2019 4:57 am

Web Title: rare disease patient in government medical college
Next Stories
1 ४९० ग्रॅम वजनाच्या बाळाला वाचवण्यात यश
2 भाजपचे प्रचार नियोजन, काँग्रेसचा उमेदवारच ठरेना!
3 तिजोरी रिकामी, तरीही १२०० कोटींच्या कामांना मंजुरी!
Just Now!
X