भारतात सिंह कुठे बघायचे असतील तर ते गीरच्या जंगलात, पण प्रत्येकालाच फक्त सिंहदर्शनाकरिता गुजरात गाठणे शक्य नसते. अशावेळी सिंहांना आपल्या भेटीला बोलावले तर! गीर अभयारण्यातील चालतेबोलते सिंह छायाचित्रातून नागपुरात अवतरले आहेत. रेड पांडा हा प्राणी देखील दुर्मीळ आणि छायाचित्रातूनही त्याचे दर्शन तेही दुर्मीळ आहे. असे असताना त्याच्या आकर्षित करणाऱ्या कृती छायाचित्रांच्या माध्यमातून अवतरल्या आहेत.

जंगल आणि वन्यजीवांविषयीची जवळीक, आपुलकी गेल्या काही वर्षांत वाढली आहे. छायाचित्रण हा त्यातील दुवा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हे छायाचित्रण पशुपक्ष्यांसाठी कधीकधी धोकादायक ठरत असले तरीही प्रामाणिकपणे केलेल्या या छायाचित्रणाने त्यांचे संरक्षणही केले आहे. अशा प्रामाणिक छायाचित्रणातून कॅमेऱ्यात बंदिस्त झालेल्या छायाचित्रांच्या कलाकृती गेल्या काही वर्षांपासून नागपूरकरांच्या भेटीला येत असतात. प्रत्येकवर्षी या कलाकृतींचा दर्जा उंचावलेला दिसून येत आहे. यावेळीदेखील सिव्हील लाईन्समधील चिटणवीस केंद्रात अशाच अत्युच्च दर्जाच्या पशुपक्ष्यांच्या अप्रतीम कलाकृती प्रदर्शनाच्या निमित्ताने अवतरल्या आहेत. संपूर्ण भारतातून वन्यजीव छायाचित्रकार यात सहभागी झाले आहेत आणि अत्युच्च दर्जाच्या कलाकृती त्यांनी याठिकाणी सादर केल्या आहेत. गीर अभयारण्यातील सिंहासोबतच सुंदरबनचे फिश आऊल, रेड पांडा अशा नानाविध कधीही न ऐकलेल्या आणि पाहिलेल्या प्रजाती याठिकाणी छायाचित्रांच्या माध्यमातून अवतरल्या आहेत. दरवर्षी साधारपणे १८ बाय १२ इंच आकाराची छायाचित्रे प्रदर्शनात असतात. यावेळी ३० बाय २० अशा आकारात छायाचित्र लावण्यात आल्याने प्रत्यक्ष पशुपक्ष्यांचे जग वन्यजीवप्रेमी याठिकाणी अनुभवत आहेत.

यावेळच्या प्रदर्शनातील वैशिष्टय़ म्हणजे भारतातील प्रसिद्ध निसर्ग छायाचित्रकार ध्रितीमन मुखर्जी यांनी या सर्व छायाचित्रांचे ऑनलाईन परीक्षण केले. पारितोषिकांसाठी छायाचित्रांची निवड करताना त्यांनी त्या निवडीमागची कारणेसुद्धा दिली आहेत. त्यामुळे एरवी पारितोषिकांसाठी छायाचित्रांची निवड करताना होणारा वाद याठिकाणी उद्भवण्यापूर्वीच मोडीत काढला आहे. परिक्षकाची माहिती, छायाचित्रामागील निवडीचे कारण असे वेगवेगळे भाग याठिकाणी प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले आहे.

हिरा पंजाबी, किरण दिनोचा यासारख्या नामवंतांच्या कलाकृती आधी प्रदर्शनात लावण्यासाठी मागवल्या जात होत्या. नवोदित छायाचित्रकारांना छायाचित्रणातील गांभीर्य कळावे हा त्यामागचा उद्देश होता. यावर्षी त्यांनी प्रथमच या प्रदर्शनात स्पर्धक म्हणून कॅमेऱ्यात बंदिस्त केलेली वन्यजीवांची छायाचित्रे पाठवली आहेत. त्यामुळे या वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाची उंची आणखी वाढली आहे.

((((  राजू हरकरे स्मृतिप्रित्यर्थ आयोजित वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर पारितोषिकप्राप्त छायाचित्रांचे अवलोकन करताना राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री. भगवान, सोबत छायाचित्रांची माहिती देताना सृष्टी पर्यावरण मंडळाचे वन्यजीव अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार विनीत अरोरा व मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते.    )))