भोयर समितीचा अहवाल विधिसभेच्या बैठकीत सादर

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नियमानुसार पीएच.डी.च्या तीन वर्षांनंतरच मार्गदर्शक होता येत होते. याचा फटका अनेक संशोधक उमेदवाराला बसत होता. मात्र, विद्यापीठाने आता या नियमावलीमध्ये बदल केला असून पीएच.डी. होताच मार्गदर्शकाचा दर्जा मिळणार आहे.

नागपूर विद्यापीठाने पीएच.डी.च्या दिशानिर्देशात बदल करण्यासाठी ज्येष्ठ विधिसभा सदस्य डॉ. आर. जी. भोयर यांच्या अध्यक्षतेत समिती तयार केली होती. समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये अहवाल सादर केला. अहवालाच्या शिफारसीनुसार, मार्गदर्शक होण्यासाठी तीन वर्षांची अट रद्द करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने २००९ साली काढलेल्या दिशानिर्देशावरुन विद्यापीठात २०१५ साली पीएच.डी.मध्ये मोठे फेरबदल करण्यात आले. त्यानुसार पीएच.डी. प्रवेशासाठी ‘पेट’ परीक्षेस सुरुवात करण्यात आली. यानंतर दोन वर्षांपूर्वी विषयनिहाय ‘पेट-२’ लागू करण्यात आली. मात्र, पेट-१ च्या काठीण्यपातळीमुळे मानव्यशास्त्रातील विद्यार्थ्यांची पीएच.डी. करणाऱ्यांची संख्या बरीच रोडावली होती. त्यामुळे गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधिसभेच्या बैठकीमध्ये डॉ. आर.जी. भोयर यांच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीमध्ये व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन कोंगरे, डॉ. उर्मिला डबीर, डॉ. मृत्युंजय सिंग, डॉ. देशकर, डॉ. चिमणकर, डॉ. अजित जाचक यांचा समावेश होता. समितीने या अटीत बदल करीत नवा शिफारसीचा समावेश केला. हा अहवाल विधिसभेच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात आला. यावेळी डॉ. भोयर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशाचा अभ्यास करून बदल करण्यात आल्याचे स्पष्ट केले. अहवालात ३२ शिफारसींचा समावेश आहे. दरम्यान,  डॉ. पेशवे समितीचा अहवाल आल्यावर दोन्ही अहवालाच्या शिफारसींचा विचार करीत, एका महिन्याच्या आत दिशानिर्देश काढण्याचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी मान्य केले.

मार्गदर्शक, उमेदवारांना दिलासा

डॉ. भोयर समितीच्या शिफारसीमुळे पीएच.डी. करणारे उमेदवार आणि मार्गदर्शकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता शिफारसीमध्ये मार्गदर्शक होण्यासाठी तीन वर्षांची अट रद्द करण्यात आली असून पीएच.डी. पदवी मिळताच मार्गदर्शकाचा दर्जा देणे, निवृत्त झाल्यावर शेवटचा उमेदवाराचा शोधप्रबंध होईस्तोवर तो मार्गदर्शकाचा दर्जा कायम ठेवणे, शोधप्रबंध सादर केल्यावर एका महिन्यात ‘व्हायवा’ घेणे आदींचा समावेश करण्यात आला आहे.