आता आंबेडकरी संघटनेच्या मागणीवरून वक्तृत्व स्पर्धा रद्द

नागपूर :  ‘हा जातीभाव विसरुनिया एक हो आम्ही’ अशी राष्ट्रवंदना सांगणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने असलेल्या नागपूर विद्यापीठाने विविध विचारधारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांच्या मागणीनुसार वैचारिक विषयांवरील कार्यक्रम रद्द करण्याचा जणू धडाकाच लावला आहे. डॉ. अरुणकुमार सिन्हा यांचे व्याख्यान रद्द केल्याचे प्रकरण ताजे असतानाच विद्यापीठाने आता डॉ. आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या मागणीवरून ‘आरक्षण आणि नवीन भारत’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धा रद्द केली आहे. मात्र, यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांना संपर्क साधला असता हा कार्यक्रम सध्या पुढे ढकलण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयामध्ये ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ या संघटनेच्या वतीने ४ जानेवारी रोजी ‘आरक्षण आणि नवीन भारत’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विधि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना कायदेविषयक अभ्यासक्रम असल्याने विशेषत्वाने हा कार्यक्रम येथे आयोजिला होता. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेने हा कार्यक्रम असंवैधानिक असल्याचे सांगून त्यास विरोध केला. संविधान हे आरक्षणाचा पुरस्कार करते आणि सेव्ह मेरिटचा कार्यक्रम हा संविधानाच्या विरोधी भूमिका घेत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या नागपूर विद्यापीठाच्या कुठल्याही इमारतीमध्ये हा कार्यक्रम घेऊ नये. असा कार्यक्रम घेतल्यास विद्यापीठ हे संविधान विरोधी भूमिका विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचा उपक्रम राबवत आहे, असे समजले जाईल, असा मजकूर नमूद असलेले निवेदन प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांना देत कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली.

यात विधिसभा सदस्य प्रशांत डेकाटे आणि शिलवंत मेश्राम यांचाही समावेश होता. डॉ. आंबेडकर विद्यार्थी संघटनेने मागणी करताच डॉ. देशपांडे यांनी संविधानविरोधी कुठलाही कार्यक्रम विद्यापीठात घेतला जाणार नाही, असे सांगत कार्यक्रम रद्द करू, असे आश्वासन संघटनेला दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. नुकतेच विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेद्वारा ‘नागरिकता’ या विषयावर डॉ. अरुणकुमार सिन्हा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

मात्र, अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने या विषयात ‘नागरिकता’ शब्द बघून त्याचा संदर्भ ‘नागरिकता सुधारणा कायद्या’शी जोडून व्याख्यान रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी तो कार्यक्रम रद्द केला. त्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेने मागणी करताच हाही कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठामध्ये कार्यक्रम रद्द करण्याची स्पर्धा सुरू आहे का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

डॉ. काणेंच्या काळात रद्द झालेले कार्यक्रम

डॉ. काणेंच्या काळात काही संघटनांच्या दबावामुळे याआधी विद्यापीठामध्ये राज्यसभा सदस्य सीताराम येचुरी यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागातर्फे आयोजित चर्चासत्रामधील भाषण रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आता अभाविच्या मागणीवरून डॉ. सिन्हा यांचे आणि आता सेव्ह मेरिटतर्फे आयोजित ‘आरक्षण आणि नवीन भारत’ ही वक्तृत्व स्पर्धेच रद्द करण्यात आली.

विद्यापीठात कुठलेही संविधानविरोधी कार्यक्रम घेतले जात नाही. संबंधित कार्यक्रम हा विधि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. मात्र, काही संघटनांचा यावर आक्षेप आल्यामुळे आयोजकांचीही भूमिका ऐकून घेण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. – डॉ. विनायक देशपांडे- प्र-कुलगुरू.