राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने क्षुल्लक कारणांसाठी अग्निहोत्री औषधनिर्माणशास्त्राच्या काही विद्यार्थ्यांचे निकाल रखडून ठेवून हीन राजकारणाचे दर्शन सुरू केले आहे. एकाच विषयाची दोन महाविद्यालये असल्यास विद्यार्थ्यांना वेठीस धरून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण यानिमित्त उघड झाले आहे.

संबंधित विषय प्रश्नरूपात विचारून सदस्य डॉ. केशव मेंढे यांनी विधिसभेत वाचाही फोडली होती. त्यावेळी विद्यापीठाने अग्निहोत्री महाविद्यालयाचे प्रकरण शिस्तपालन कृती समितीसमोर विचाराधीन असल्याचे उत्तर दिले होते. मात्र, संबंधित प्रकरण पाहता  वर्धेच्या दोन महाविद्यालयांच्या स्पर्धेचे हे राजकारण असल्याचे दिसून येते. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे निकाल रखडून ठेवून त्यांना रडकुंडीला आणले आहे.

अग्निहोत्री महाविद्यालयामध्ये एम.फार्म. हा विषय आहे. त्यात ४०० गुणांचा व्हायवा असतो. त्यासाठी मुलांनी एका संशोधन प्रकल्पाचे सिनॉपसिस ३१ जुलैपर्यंत जमा करायचे असते. त्यावर संशोधन समिती (आरआरसी) कडून मान्यता मिळाल्यानंतर व्हायवासाठी विद्यापीठ पॅनल स्थापन करून त्यातील तज्ज्ञांची नावे महाविद्यालयाला पाठवते. महाविद्यालये संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधून मुलांचा व्हायवा घेऊन ते गुण विद्यापीठाला पाठवतात आणि लगेच विद्यापीठ त्याचा निकालही जाहीर करते. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून आठ विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने लावले नाहीत. पाच विद्यार्थ्यांसाठी तर व्हायवा घेणाऱ्या तज्ज्ञांचे पॅनल देखील लावले नाही, तर काहींसाठी सहा महिन्याने पॅनल लावले आहे. अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.

एम.फॉर्म.च्या विद्यार्थ्यांचे आरआरसीसमोर सिनॉपसिस मान्य झाल्यानंतर विद्यापीठाने गेल्यावर्षी १२ जुलैला तीन तज्ज्ञांच्या पॅनलची नावे दिली. व्हायवासाठी आम्ही तज्ज्ञांना फोन केले. एकाने २७ जुलै, दुसऱ्याने २८ जुलैचा दिवस निश्चित केला. जोपर्यंत पहिला नाही म्हणत नाही तोपर्यंत पुढील तज्ज्ञांकडे जाण्याचा प्रश्नच नाही. मात्र, ऐनवेळी त्याने व्हायवा घेण्यास येणे रद्द केले तर अडचण होते. त्यानुसार २७ जुलैची तारीख देणाऱ्या तज्ज्ञाने २ ऑगस्टला संमती दिली. त्यानुसार २ आणि १४ ऑगस्टला आम्ही व्हायवा घेतला. व्हायवा होणारच आहे म्हणून आम्ही विद्यापीठाला कळवले नाही, ही आमची चूक झाली. कारण प्रक्रिया सुरूच होती. आम्ही उशिरा व्हायवा का घेतला म्हणून विद्यापीठाने काही विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले नाहीत. त्याऐवजी आमच्यावर दंड करू शकले असते किंवा संलग्नीकरणाच्यावेळी काही कारवाई करू शकले असते. विद्यार्थ्यांचे नुकसान का केले?

– डॉ. धमेंद्र मुंदडा, प्राचार्य, अग्निहोत्री फार्मसी कॉलेज, वर्धा</strong>

या प्रकरणात विद्यापीठाची चूक आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी ते खेळत आहेत. विधिसभेत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी महाविद्यालयावर ५० हजाराचा दंड जाहीर केल्याचे कळले आहे, पण या प्रकरणात बिचाऱ्या विद्यार्थ्यांना वेठीस धरून त्यांना निकालापासून वंचित ठेवले आहे.

– डॉ. केशव मेंढे, सदस्य, विधिसभा, नागपूर विद्यापीठ