विद्यार्थिनींमध्ये जागरूकताच नाही; विद्यापीठाच्या प्रशासकीय स्तरावरही उदासीनता

देवेश गोंडाणे, नागपूर</strong>

महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर वेगवेगळे अध्यादेश निघत आहेत. मात्र, याबाबत शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठस्तरावर पुरेसे गांभीर्य दिसत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात अद्यापही सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीनच लागलेले नाही.  शैक्षणिक परिसरातील काही विभागात व्हेंडिंग मशीन असले तरी   विद्यार्थिनींमध्ये ते वापराबाबत पुरेशी जागरूकता नसल्यामुळे ते शोभेची वस्तू ठरले आहे.

प्रत्येक शैक्षणिक संकुलात महिलांना सॅनिटरी नॅपकीन सहजतेने मिळण्यासाठी व्हेंडिंग मशीन बसवण्याचा शासकीय अध्यादेश आहे. शैक्षणिक संस्थेत ‘नॅक’ समितीसुद्धा व्हेंडिंग मशीन सुविधा असल्याची विचारणा करीत असते. ‘नॅक’चे निकष पाळण्यासाठी बहुतेक संस्था मशीन बसवतात. मात्र बहुतेक मशीन नेहमी बंद असतात. कार्यान्वित मशीनमध्ये पॅड नसतात. नागपूर विद्यापीठातील काही विभाग आणि प्रशासकीय इमारतीत मशीन आहेत. मात्र, त्यांचा पुरेसा वापर होत नसल्याचे पाहणीत आढळले. यासंदर्भात विद्यापीठातील काही विद्यार्थिनींशी संवाद साधला असता विद्यापीठ शैक्षणिक परिसरामध्ये आतापर्यंत सॅनिटरी नॅपकीनबाबत कुणीच माहिती दिली नसल्याचे सांगितले. काही विभागात व्हेंडिंग मशीनची सोय असली तरी ती वापरण्यातही अनेक समस्या असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. काही मुली नॅपकीन विकत आणतात. पाच रुपयांचे जुने (जाड) नाणे मशीनमध्ये टाकल्यानंतर पॅड मिळतो. नवीन नाणे टाकल्यानंतर मिळत नसल्याची समस्या आहे. एक रुपयांची नाणी कशा पद्धतीने टाकायची याची विद्यार्थिनींना माहितीच नाही. परिणामी, मशीनचा वापर वाढण्यास अडथळे येत आहेत. विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील शैक्षणिक परिसरामध्ये ३२ विभाग आहेत. मात्र, यातील बहुतांश विभागात व्हेंडिंग मशीन नाहीत.

महिला वसतिगृहात अद्याप मशीन नाही

गांधीनगर भागात विद्यापीठाचे महिला वसतिगृह आहे. येथे जवळपास दोनशे विद्यार्थिनी राहतात. मात्र, असे असतानाही अद्याप येथे सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन लागलेले नाही. येत्या दोन महिन्यात विद्यापीठाच्या विविध विभागांची ‘नॅक’ समितीकडून पाहणी होणार आहे. मात्र, असे असतानाही विद्यापीठ मुलींच्या आरोग्यासंदर्भात पुरेसे गंभीर दिसत नाही.

जागृतीसाठी कार्यशाळेची गरज

केवळ सरकारी अध्यादेश निघतो म्हणून शैक्षणिक संस्था व्हेंडिंग मशीन लावतात. विद्यर्थिनींमध्ये जागरूकता वाढवून त्याचा पुरेपूर वापर करण्याबाबत गांभीर्य नसते. ही परिस्थिती बदलण्यासाठी नियमित कार्यशाळा घेण्याची गरज आहे, असे मत काही विद्यापीठातील काही महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

वसतिगृहात अद्यापही सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन लावण्यात आली नाही. मात्र, आम्ही निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून लवकरच विद्यापीठाची परवानगी मिळणार आहे. त्यानंतर मशीन लावण्यात येईल.  अनेक विभागांमध्ये मशीन सुरू आहेत. मुलींना वापराबाबत पुरेशी माहिती दिली जाते.

– डॉ. मंदाकिनी पाटील, अधीक्षक, महिला वसतिगृह.