भैय्याजी जोशी यांचे भाजपच्या लोकप्रतिनिधींना ‘बौद्धिक’
संघाच्या विविध विस्तार योजनांबरोबरच शिस्तीचे भान ठेवून समाजहितासाठी काम करा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त उपराजधानीत आलेल्या भाजपच्या मंत्री आणि आमदारांना गुरुवारी सकाळी बौद्धिक देताना दिला. भाजपचे १२२ आमदार असून, सर्वाना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असताना काही आमदार व मंत्री मात्र फिरकले नसल्याचे दिसून आले.
उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती हरिभाऊ बागडे यांच्यासह राज्यातील भाजपचे विविध मंत्री आणि आमदारांनी गुरुवारी सकाळी रेशीमबागेत स्मृतिभवनाला भेट देऊन आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले.
सकाळी ९.३० च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्मृति भवन परिसरात पोहोचल्यावर त्यांनी प्रथम भैय्याजी जोशी यांची भेट घेतली. त्यानंतर ते भैय्याजींना घेऊन महर्षी व्यास सभागृहात आले. यावेळी प्रथम सर्व आमदार आणि मंत्र्यांनी परिचय करून दिल्यावर त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि संघातर्फे चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
परिचयानंतर भैय्याजी जोशी यांचे बौद्धिक झाले. त्यात त्यांनी संघाच्या कार्याचा विस्तार, आमदार व मंत्री म्हणून समाजहितासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार आदी विषय हाताळले. जवळपास ४० मिनिटे चाललेल्या या वर्गानंतर संघाशी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत परिसरातून बाहेर पडले. गेल्यावर्षी आलेल्या आमदारांनी संघाच्या परिसराची पाहणी करून संघाच्या कार्याची माहिती जाणून घेतली. मंदा म्हात्रे, विजयकुमार गावित प्रथमच संघाच्या भूमीत आले होते त्यामुळे त्यांनी संघाची माहिती जाणून घेतली.