रातुम विद्यापीठाचा अजब कारभार

गेल्या १० वर्षांपासून उत्पादन अभियांत्रिकी या विषयाला एकही विद्यार्थी नसताना आणि या विषयाची परीक्षाच होत नसतानाही नागपूर विद्यापीठात अभ्यासमंडळ अस्तित्वात असून त्यावर कुलगुरूंनी दुसऱ्याच विषयाचे तीन प्राध्यापक नामनिर्देशित केले आहे. त्यामुळे हे अभ्यास मंडळ नेमके कुणासाठी काम करते, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे.

विद्यापीठ ज्या विषयाचे कधी वेळापत्रक तयार करीत नाही, परीक्षाही होत नाही आणि तो विषयच परीक्षा विभागातून हद्दपार झालेला असताना विद्यापीठात मात्र, गेल्या १० वर्षांपासून हे वैधानिक अभ्यासमंडळ  अस्तित्वात असल्याचा हास्यास्पद प्रकार कुलगुरू नामांकनामुळे उघडकीस आला आहे. विषयाचे शिक्षकच अस्तित्वात नसताना इतर विषयांचे शिक्षक आयात करून अभ्यासमंडळ कुणाच्या फायद्यासाठी चालवले जात आहे? एखाद्या विषयात मान्यता प्राप्त शिक्षकच नसतील किंवा कमी असतील तर त्याचे तदर्थ अभ्यासमंडळ स्थापन करण्याची कायद्यात तरतुद आहे. मात्र, एकही विद्यार्थी नसलेल्या विषयाचे अभ्यासमंडळ स्थापन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ एकमेव असावे.

अभ्यासमंडळाच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये पार पडल्या. त्यात तीन प्राध्यापकांना प्रत्येक अभ्यासमंडळावर निवडून द्यायचे होते. मात्र, उत्पादन अभियांत्रिकी या अभ्यासमंडळावर शिक्षकांच्या अभावी वायसीसीईचे अनिल काळे आणि प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे चंद्रशेखर साकळे हे दोनच शिक्षक निवडून आले आहेत. त्यानंतर नुकतेच कुलगुरूंनी अभ्यासमंडळावर तिघांची नावे नामनिर्देशित केली आहेत. त्यात केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. आर.एच. पारेख, सेंट विन्सेंट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. प्रमोद लांजेवार, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. व्ही.एस. देशपांडे या तिघांचा समावेश आहे. आश्चर्य म्हणजे यातील एकही प्राध्यापक उत्पादन अभियांत्रिकी या विषयाचा नाही. अभ्यास मंडळावर निवडून आलेले  काळे आणि साकळे यांना यंत्र अभियांत्रिकीचे शिक्षक म्हणून मान्यता मिळाली आहे. तर नुकतेच नामनिर्देशित पारेख, लांजेवार आणि देशपांडे हे तिघेही यंत्र अभियांत्रिकी विषयाचे आहेत. मात्र, तरीही ते उत्पादन अभियांत्रिकी अभ्यासमंडळाचे सदस्य म्हणून काम करणार आहेत. उत्पादन अभियांत्रिकीत एकही विद्यार्थी नसताना हे नेमके कुणासाठी काम करणार आहेत? आणि कुलगुरूंनी याची शहानिशा न करताच नियमबाह्य़ नामनिर्देशित करीत सुटले आहेत, याविषयी विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कायद्यामध्ये विषयांचा समूह अशी संकल्पना आहे. त्यामुळे उत्पादन, मेटलर्जी आणि इंडस्ट्रीअल या विषयाचे शिक्षक अभ्यासमंडळावर येऊ शकतात. या विषयाचे विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये असतीलच! तसेच विषयाचे माजी विद्यार्थी नाकारता येत नाही. त्यांच्यासाठी परीक्षकांचे पॅनल लावताना अभ्यासमंडळाची गरज पडतेच.

डॉ. अनिल हिरेखण, उपकुलसचिव, विद्या विभाग, नागपूर विद्यापीठ

उत्पादन अभियांत्रिकीची परीक्षा घेतली जात नाही. कारण एकही विद्यार्थी या विषयाचा नाही. ती शाखाच बंद झाली आहे. त्याचे वेळापत्रकही लावले जात नाही. मी परीक्षा नियंत्रक होण्यापूर्वीच ही शाखा बंद झाली होती. शिवाय या विषयातील नापास विद्यार्थ्यांच्या परीक्षाही पूर्ण झाल्या आहेत.

डॉ. नीरज खटी, परीक्षा नियंत्रक, नागपूर विद्यापीठ