प्राध्यापकांचा आरोप, प्राचार्याकडून मात्र खंडन
रायसोनी अभियांत्रिकी या स्वायत्त महाविद्यालयात गुणवाढ करून निकालाची टक्केवारी वाढवली जात असल्याचा आरोप तेथील आजी-माजी प्राध्यापकांकडून केला जात असून महाविद्यालयाच्या प्राचार्यानी मात्र, त्याचे खंडन करून गुणवत्तेबाबत कोणतीच तडजोड केली जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नुकत्याच झालेल्या हिवाळी परीक्षेत एका पेपरचा निकाल कमी लागल्याने सरासरी निकालावर त्याचा परिणाम होईल म्हणून उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्यात आल्या आणि गुणवाढ करून निकाल जाहीर करण्यात आला. अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल शाखेच्या तिसऱ्या सत्रातील ‘फ्लूड पावर-१’ विषयाचा निकाल ३५ ते ४० टक्के लागल्याने पुन्हा उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे तसे आदेशच सहाय्यक प्राध्यापकांना दिले जातात आणि विभाग प्रमुखांमार्फत तशी कामे करून घेतली जातात. जे प्राध्यापक तसे करण्यास नकार देतात त्यांना नंतर नियमित करण्यात येत नाही किंवा कामावरून कमी केले जात असल्याचा आरोप गेल्या काही वर्षांपासून या महाविद्यालयावर होत आहे.
गुणवाढ करून निकाल वाढवण्यात आल्याचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे या विषयाचा पेपर २० ऑक्टोबरला झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका दाखवण्याचा दिवस आठ दिवसांनी म्हणजे २७ ऑक्टोबर असा होता. मात्र, मेकॅनिकल शाखेचा निकाल २७ नोव्हेंबरला जाहीर करण्यात आला. मधल्या काळात पेपर पुन्हा तपासण्यात येऊन गुणवाढ करून निकालाची टक्केवारी वाढवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, असा कुठलाही प्रकार महाविद्यालयात होत नसल्याचे रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. प्रीती बजाज यांनी स्पष्ट केले आहे. आपले निकाल आठ ते दहा दिवसात लागतात. साधारणत: आपलेच निकाल लवकर लागतात. आपल्याकडील निकाल कडक, परीक्षा समितीच्या नियंत्रणात हे काम चालते. त्यांच्यामध्ये गुणांमध्ये काहीही बदल करता येत नाही. स्वायत्तता म्हणजे आपल्या हातचे नाही. यूजीसीची त्यावर देखरेख असते.
अंतर्गत समित्या आहेत. दोन गुण मिळाले तर दोनच राहतात. आमच्याकडील शैक्षणिक मूल्यांकन आयआयटीचे प्राध्यापक करतात. दरवर्षी २५ ते ३० आयआयटी प्राध्यापक महाविद्यालयाला भेट देतात. आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक महाविद्यालयाच्या कामावर देखरेख करीत असतात.

‘परीक्षा विभागाशी आमचा संबंध नाही’
कोणी गुण वाढवले नाही तर त्यांना कामावरून कमी केले जाते किंवा काढून टाकले जाते. हा सरळसरळ चुकीचा आरोप असून गेल्या चार वषार्ंमध्ये कुठे ना कुठे यासंबंधीच्या तक्रारी वरिष्ठ पातळीवर गेल्या असत्या. महत्त्वाचे म्हणजे माझ्याकडून गुण दिलेच जात नाही. परीक्षा विभागाशी आमचा संबंध येत नाही. माझी स्वाक्षरीही त्यावर नसते. मूल्यांकन करणारे येतात. ते कोणीही मला भेटतसुद्धा नाहीत. १५० कॅमेरे महाविद्यालयात लागले आहेत. महाविद्यालयातील काम उच्च दर्जाचे असून उद्योगांच्या पसंतीस उतरावे अशी आमची इच्छा असल्याने आम्ही विशेष मेहनत घेतो. मोठमोठय़ा कंपन्यांतील व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक महाविद्यालयाला भेट देतात. निव्वळ ते प्रकल्प पहायला येतात. ते कुठलेही मानधन ते घेत नाहीत. दिल्ली, पुणे, हैदराबाद, मुंबई, बंगळुरूवरून ही मंडळी येते. गुणवत्ता असल्यामुळेच ते येतात, अशी माहिती या महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. प्रीती बजाज यांनी दिली.