महापालिकेकडे मात्र स्वतंत्र नोंद नाही

नागपूर :  महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना करोनाची दुसऱ्यांदा बाधा झाल्याची माहिती आहे. तर शहरात दुसऱ्यांदा बाधा होणारे रुग्ण हळूहळू वाढत असून प्रशासनाकडे या रुग्णांची स्वतंत्र नोंदच नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा बाधा झालेल्या रुग्णांमध्ये काही इतरही अडचणी येत आहे काय, याबाबत सध्या मेडिकल, मेयो, एम्सच्या डॉक्टरांकडे उत्तर नाही.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मध्यंतरी वैद्यकीयशी संबंधित वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांशी करोनाशी संबंधित विषयावर अनौपचारिक चर्चा करत सुधारणेबाबत सूचना मागवल्या होत्या. याप्रसंगी स्वत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयातील सातहून अधिक कर्मचाऱ्यांना करोनाची दुसऱ्यांचा बाधा झाल्याचे कळवले होते. दरम्यान, शहरातील विविध भागात आता अधूनमधून दुसऱ्यांदा करोनाची बाधा होणारे रुग्ण वाढत असल्याचे काही खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांच्या निरीक्षणात लक्षात येत आहे. रविवारी नागपूर महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनाही दुसऱ्यांदा बाधा झाल्याचे पुढे आले. या अधिकाऱ्यांना मधुमेहाचाही त्रास आहे. त्यामुळे आता या अधिकाऱ्याकडून गृहविलगीकरणात उपचार घेतले जात आहे. सध्या त्यांना जास्त त्रास नाही. परंतु यामुळे महापालिका प्रशासनाकडे दुसऱ्यांदा करोना झालेल्या रुग्णांची माहितीच नसल्याचे समोर येत आहे.

तर मेडिकल, मेयो, एम्समध्येही दुसऱ्यांदा करोना झालेल्या रुग्णांच्या नोंदी नाहीत. परंतु येथे उपचार केले जात असले तरी त्यांच्यात काही वेगळे बदल बघायला मिळत आहेत काय? याबाबत कुठेच नोंदी नसल्याने कुणाहीकडे त्याबाबतची उत्तरे नाही.

तर काही डॉक्टरांकडून मात्र नाव न टाकण्याच्या अटीवर दुसऱ्यांदा करोना झाल्यास घाबरण्याचे कारण नसून या रुग्णात लवकर प्रतिपिंड (अँटीबॉडी) तयार होत असल्याने ते लवकरच बरे होत असल्याचे सांगण्यात आले.