महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळे लाखोंचा भुर्दंड

नागपूर :  महापालिकेने गणपती मूर्ती विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलावावर गेल्या दोन वर्षांत दोन कोटीवर रुपये खर्च केले आहेत. तरीही यावर्षी कृत्रिम तलावांसाठी निविदा काढत त्यावर पुन्हा लाखो रुपये खर्च केले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून विसर्जनाच्या कृत्रिम टाक्यांसह इतरही साहित्याकडे लक्ष न दिल्याने प्रशासनाच्या या चुकीमुळे लाखो रुपयाचा भुर्दंड महापालिकेला बसणार आहे. टाक्या खरेदी संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत आहे हे विशेष.

शहरात विविध भागातील तलावातील प्रदूषण टाळावे, जैवविविधता टिकून राहावी यासाठी गणेशोत्सवात दरवर्षी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करून तलावात विसर्जनास बंदी घातली जाते. तरीही मोठय़ा प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिससह मातीच्या गणपती मूर्ती तलावात आढळतात. गेल्यावर्षी महापालिकेने या कृत्रिम टाक्यावर १ कोटी ५ लाख रुपये खर्च केले होते. ३७ फायबरच्या टाक्या घेतल्या होत्या. मात्र देखभाली अभावी त्यातील केवळ ५ टँक शिल्लक असून त्यातील २ नादुरुस्त आहे. त्यामुळे यावर्षी फायबरच्या ७१ कृत्रिम टाक्या खरेदी केल्या जाणार असून यासाठी ७० लाखांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे. त्यासाठी विसर्जनाच्या आधी निविदा काढली असून त्यातून ३३ लाख ४० हजार रुपये महापालिकेला यासाठी मोजावे लागणार आहे.

शहरातील तलाव प्रदूषित होऊ नये यासाठी गेल्या चार वर्षांपासून महापालिकेने कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन सुरू केले. त्यासाठी तलाव परिसरात आणि  विविध भागात कृत्रिम टँकची व्यवस्था केली. विसर्जनासाठी झोन पातळीवर तसेच तलावाच्या ठिकाणी फायबरचे टाकीसह सेंन्ट्रीगचे आणि खड्डय़ाचे तलाव तयार केले जातात. यावेळी शहरात सर्वच तलावावर विसर्जनाला बंदी जास्तीत जास्त कृत्रिम टँकची व्यवस्था महापालिकेला करावी लागणार आहे. त्यासाठी महापालिका फायबरच्या १५ फूट व्यासाच्या ४७ आणि १२ फूट व्यासाच्या २४ कृत्रिम टँक अशा एकूण ७१ टँक खरेदी करणार आहे. १५ फूट व्यासाची एक टँक ४८ हजार ३५१ तर १२ फूट व्यासाची टँक ४४ हजार ४३१ रुपये प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे.

झोननिहाय कृत्रिम टँक

नेहरूनगर झोन    ३३

लक्ष्मीनगर    ३७

लकडगंज      ३२

हनुमाननगर  ३५

धंतोली  ३१

धरमपेठ   ३५

मगळवारी  १६

सतरंजीपुरा     १८

आशीनगर      १२