राम भाकरे

दोन महिन्यानंतर सुरू झालेल्या महापालिका शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती असावी, असा आदेश असताना शहरातील अनेक मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळेत मात्र शिक्षक उदंड अन् बाकडे रिकामी, असे विदारक चित्र होते.

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असलेल्या नंदनवनमधील महापालिकेच्या एका मराठी शाळेत चक्क चार शिक्षक व १० विद्यार्थी तर उर्दू शाळेत तीन शिक्षक व सात विद्यार्थी आज शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित होते. मराठी शाळांची संख्या वाढवण्यासाठी राज्यात विविध आंदोलन आणि चर्चा सुरू असताना महापालिकेच्या शाळेतील हे चित्र बघता मराठी शाळा कशा वाढतील, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबवले जात असताना पहिल्या दिवशी अनेक शाळांमध्ये महापालिका शिक्षकांची उदासीनता दिसून आली. प्रस्तुत प्रतिनिधीने पूर्व नागपुरातील काही शाळेत फेरफटका मारला असता अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची  संख्या फारच कमी होती. नंदनवन झोपडपट्टी भागात महापालिकेची नंदनवन प्रा. शाळा क्रमांक दोन आहे. या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असून एकूण ३२ विद्यार्थी आहेत. त्यातील पहिल्या दिवशी केवळ सात विद्यार्थी हजर होते. तेही शेजारी रस्त्यावर खेळत असताना त्यांना बळजबरीने वर्गात बसवण्यात आले. नंदनवन झोपडपट्टीमध्ये मोठय़ा प्रमाणात गोरगरीब कुटुंब असले तरी त्यातील अनेकांनी आपल्या मुलांना खासगी शाळेत घातले आहे.

हसनबाग उर्दू उच्च प्रा. शाळा आणि त्याच्या शेजारी शिवणकर नगर उर्दू प्रायमरी शाळा आहे. या दोन्ही शाळांमिळून ९ शिक्षक, दोन चपराशी आहेत. मात्र विद्यार्थी केवळ ४७ आहेत. दोन महिने शाळा बंद असल्यामुळे शाळांची स्वच्छता करण्यात आली नव्हती. त्यामुळे जे काही १२ विद्यार्थी शिक्षकांनी ऑटो पाठवून आणले त्यांना शाळेच्या वऱ्हांडय़ामध्ये बसवण्यात आले. शिवणकर शाळेत केवळ चार विद्यार्थी असल्यामुळे शाळेच्या परिसरात खेळत असलेले दोन चिमुकले तेथील शिक्षकांनी आणून बसवले.

नगरसेवक शाळेकडे फिरकलेच नाहीत

नंदनवन परिसरातील महापालिकेच्या नंदनवन प्राथमिक शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून या ठिकाणी एकूण विद्यार्थ्यांची संख्या ४० आहे. त्यातील पहिल्या दिवशी केवळ दहा विद्यार्थी आणि चार शिक्षक उपस्थित होते. पहिल्या दिवशी त्या त्या भागातील नगरसेवकांनी विद्यार्थ्यांना फुले देऊन स्वागत करावे असे निर्देश होते. मात्र, विद्यार्थ्यांची संख्या बघून नगरसेवक शाळेकडे फिरकलेच नाहीत.

नंदनवन परिसरात खासगी शाळांची संख्या वाढल्याने महापालिका शाळेत मुले मिळणे कठीण झाले आहे. आम्ही वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये फिरत असतो. मात्र, मुले मिळत नाही. नंदनवन शाळेत सध्या ३० ते ३२ विद्यार्थी असून येत्या काही दिवसात जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील यासाठी प्रयत्न करू. मुलांचा शिक्षणाचा  आणि त्यांचा जाण्या-येण्याचा खर्च देऊनही विद्यार्थी मिळत नसतील तर आम्ही काय करावे.

– रमा दफरे, शिक्षिका, नंदनवन प्राथ. शाळा.

हसनबागेतील शाळा नंदनवन परिसरात आणली. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. यावर्षी पहिली ते पाचवी इयत्तेमध्ये एकूण ३५ विद्यार्थी आहेत. पहिल्या वर्गात एकही विद्यार्थी नाही. शाळेतून गाडी पाठवतो तरीही विद्यार्थी येत नाही.

– मोहमंद सरफराज, शिवणकर नगर उर्दू माध्यमिक शाळा, नंदनवन.