५३.१८ कोटी टन कोळसा उत्पादित

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने (वेकोलि) नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत कोळसा उत्पादनाचे ४९.७० कोटी टन इतके लक्ष्य सहज गाठत त्यापेक्षाही जास्त म्हणजे ५३.१८ कोटी टन कोळसा उत्पादित करुन नवा विक्रम नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या उत्पादन क्षमतेच्या तुलनेत यंदा वेकोलिने ७ कोटी टन कोसळा अधिकचा उत्पादित केला आहे. तब्बल आठ वर्षांच्या दीर्घ काळानंतर कंपनीने आपले उत्पादनाचे लक्ष्य गाठले आहे.

वेकोलिने या उत्पादनासह आपल्या स्थापन काळापासून सर्वाधिक म्हणजे १५ टक्क्यांनी वाढ यंदा नोंदवली आहे. वेकोलिच्या या यशात सर्व टीमचे महत्त्वपूर्ण योगदान असून गेल्या चार वर्षांत २० नव्या खाणींचाही मोलाचा वाटा राहिला आहे. याशिवाय गेल्या आर्थिक वर्षांत वेकोलिने भूमिग्रहण कार्यक्रमाअंतर्गत जवळपास ९९०  हेक्टर जमीन प्राप्त केली आहे. यामध्ये ४०३.९२ कोटी रुपये आणि ४१० व्यक्तींना कंपनीत रोजगार मिळाला आहे. यंदा कंपनीने वणी क्षेत्रात असलेल्या पेनगंगा खाणीतून सर्वाधिक ६.३० कोटी टन कोळसा उत्पादित केला आहे. तसेच उमरेड खाणीतून ४.९ कोटी टन तर मकरढोकळा खाणीतून ३.२६ कोटी टन कोळशाचे उत्पादन केले आहे. वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीमुळे नव्या २० खाणींव्यतरिक्त जुन्या खाणींचीही क्षमता वाढविण्यात वेकोलिला यश प्राप्त झाले आहे. २०१८-१९ मध्ये कोळसा उत्पादनात झालेल्या वाढीमुळे  महाजनको आणि एनटीपीसी सारख्या मोठय़ा कंपन्यांसोबतच अन्य उपभोक्तयांना कोळसा देण्यात वेकोलि यशस्वी ठरले आहे.