डायबेटिज केयर फाऊंडेशनचा अभ्यास

शहरातील मुले आणि मुलींच्या विवाहाचे वय वाढत असताना नव्याने मधुमेह जडणाऱ्यांचे वयोमान मात्र कमी होत आहे. डायबेटिज केयर फाऊंडेशनने केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष पुढे आला आहे.

अभ्यासातील निष्कर्षांनुसार, नागपूर शहरात पूर्वी वर्षांपूर्वी मुलींचे विवाहाचे सरासरी वय १८ वर्षे होते. त्यानंतर दहा वर्षांनंतर हे वय वाढून २० च्या जवळपास आले. हल्ली २६ ते २७ वयोगटात मुलींचे विवाह होत असल्याचे शहरातील सुमारे ९०० गर्भवती महिलांच्या अभ्यासातून निदर्शनात आले. हीच स्थिती मुलांच्या बाबतीतही आहे. विलंबाने विवाह होण्याला उच्च शिक्षणासह इतर कारणे जबाबदार आहेत. कमी वयात विवाह झालेल्या महिला गर्भवती असतांना त्यांना मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे. शहरातील मधुमेह तज्ज्ञांकडे या कारणामुळे मुले व मुली लग्नानंतर मधुमेहाचा त्रास बघता येणाऱ्या नवीन बाळासाठी सल्ला घेण्याकरिता येण्याचे प्रमाण वाढले आहे. मधुमेहामुळे या महिलांसह त्यांना होणाऱ्या बाळांमध्ये प्रसूतीच्या दरम्यान काही गुंतागुंत वाढते.

प्रसूतीच्या दरम्यान महिलांमध्ये मोठय़ा प्रमाणावर होणारे संप्रेरकांमधील बदल, वाढता तणाव, लठ्ठपणा, खानपानाच्या वाईट सवयींमुळे त्यांना मधुमेहाचा धोका असतो. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) सुमारे ७ वर्षांपूर्वी १ हजार महिलांच्या अभ्यासात सुमारे ८.५ टक्के महिलांमध्ये मधुमेह आढळला. या रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांमध्ये गरिबांची संख्या जास्त असल्याने व त्यांच्यात श्रम करण्याचे प्रमाण जास्त असल्याने ही संख्या कमी होती. ती चांगले राहणीमान असलेल्या नागरिकांमध्ये निश्चित त्याहून जास्त आहे. चेन्नईमध्ये झालेल्या अभ्यासात १६ ते १८ टक्के नागरिकांना आढळून आले. तर लखनौ, पंजाबमध्ये हे प्रमाण चेन्नईसदृश्यच आहे. कमी वयात मधुमेह टाळण्याकरिता खानपानाच्या वाईट सवयी टाळणे, नित्याने व्यायाम, मैदानी खेळाचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे.

हॅलो डायबेटिज रविवारी

जागतिक मधुमेह दिनानिमित्त डायबेटिज केयर फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि डायबेटिज केअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या संयुक्त विद्यमाने ‘हॅलो डायबेटिज’ हा कार्यक्रम साई सभागृहात रविवारी, १२ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते दुपारी ३ दरम्यान चालणाऱ्या कार्यक्रमात मध्य भारताच्या विविध भागातून मोठय़ा संख्येने मधुमेहग्रस्त व त्यांचे नातेवाईक सहभागी होतील. याप्रसंगी मधुमेहग्रस्तही सामान्य जीवन जगू शकत असल्याचे विविध नाटय़ व कार्यक्रमातून  सांगण्यात येईल. कार्यक्रमाला डॉ. विलास डांगरे यांच्यासह बरेच मान्यवर हजेरी लावतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत डॉ. सुनील गुप्ता यांनी दिली. याप्रसंगी डॉ. सरिता उगेमुगे, डॉ. अजय अंबाडे, डॉ. मोहित झामड, कविता गुप्ता उपस्थित होत्या.

देशात सहा गर्भवती महिलांमध्ये एकीला मधुमेह

जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार जगात सातपैकी एका गर्भवती महिलेला मधुमेह असल्याचे निदर्शनात येत आहे. भारतात त्याहून गंभीर स्थिती असून येथे सहापैकी एका महिलेला हा आजार आढळतो. शहरात स्थिती वेगळी नसून शहरातील मुलींच्या विवाहाचे वय वाढत असताना कमी वयात मधुमेह असल्याचे निदर्शनात येत आहे. मधुमेह हा आजार योग्य काळजी घेऊन टाळणे शक्य असून या आजाराची लागण झाल्यावर योग्य औषधोपचाराने त्यावर नियंत्रण शक्य आहे, परंतु त्याकरिता प्रत्येकाने योग्य काळजी घेण्याची गरज आहे.

डॉ. सुनील गुप्ता, डायबेटिज केयर फाऊंडेशन ऑफ इंडिया, नागपूर