वनखात्याचा अजब कारभार; उपलब्ध जैवविविधता नष्ट करण्याच्या प्रकाराने निसर्गप्रेमी चक्रावले

वनखात्याच्या प्रादेशिक विभागाने जैववैविधता उद्यान तयार करण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य, पण त्यासाठी वनसंवर्धन कायद्याचा भंग करत उपलब्ध जैववैविधता नष्ट करण्याचा प्रकाराने मात्र निसर्गप्रेमीही चक्रावले आहेत. अंबाझरी पाणलोट क्षेत्रातील संरक्षित वनक्षेत्रात पक्षीनिरीक्षणासाठी गेलेल्या पक्षीनिरीक्षकांमुळे हा प्रकार उघडकीस आला. तात्पुरते हे काम थांबवण्यात ते यशस्वी ठरले तरीही उद्याचे काय, या प्रश्नाने तेसुद्धा चिंताग्रस्त आहेत.

अंबाझरी पाणलोट विकास, मृदा-जलसंधारण तसेच जैववैविधता उद्यान या उपक्रमावर वनखात्याच्या प्रादेशिक विभागाने शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्र्यांनीही थाटामाटात या कामांचे भूमिपूजन केले, पण भूमिपूजनाच्या दिवशीच प्रादेशिक वनविभागाने पोकलेन चालवून वनसंवर्धन कायद्यातील तरतुदींचा भंग केला. नागनदीच्या पुनरुज्जीवनासाठी अंबाझरी पाणलोट क्षेत्राचा विकास व मृदा जलसंधारण कामाचे संवर्धन आवश्यक आहे. प्रादेशिक वनविभागाने या कामासाठी हिंगणा वनपरिक्षेत्रातील संपूर्ण कर्मचारी वर्ग इकडे स्थानांतरित केला. हिंगणा वनपरिक्षेत्रात वाघांची संख्या मोठी असून, वन्यप्राण्यांचा तो कॉरिडॉर आहे. त्यामुळे व्याघ्रअधिवास धोक्यात आला आहे. जैववैविधता उद्यानासाठी वनखात्याने मोठमोठय़ा झाडांवर पोकलेन चालवून झाडे तोडली. ‘बर्ड्स ऑफ विदर्भ’चे अनिरुद्ध भगत, कादर बहार, आशिष तिवारी, व्यंकटेश मुदलीयार, नितीन मराठे, परिमल वैद्य, संजय नाफडे आदी सदस्य सकाळी पक्षीनिरीक्षणासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. इंडियन पॅराग्लाईड फ्लायकॅचर या पक्ष्याने एका झाडावर घरटे विणण्यास सुरुवात केली होती. त्यावर पोकलेन चालल्याने ते घरटे पूर्ण होण्याआधीच उद्ध्वस्त झाले. त्यासोबतच इंडियन पिट्टा आणि नवरंग या पक्ष्यांची घरटीसुद्धा उद्ध्वस्त झाली आहेत. सृष्टीतला प्रत्येक घटक महत्त्वाचा असताना, त्यातील अर्धाअधिक अधिवास नष्ट करण्यासाठी वनखातेच कारणीभूत ठरत आहे. जैववैविधता उद्यानाकरिता खड्डे करून वृक्षारोपण केले जाईल, पण ती जगवण्यासाठी वनखाते सक्षम आहे का, हेही महत्त्वाचे आहे. वृक्षारोपण करायचे आणि वाऱ्यावर सोडायचे अशीच आजवरची स्थिती आहे. त्यामुळे आहे ती झाडे टिकवण्याचे काम वनखात्याचे आहे. ती कामे न करता वनसंवर्धन कायद्याचा भंग करणे सुरू असलेल्या वृक्षतोडीवर निसर्गप्रेमींच्या वर्तुळातून आज तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

शहरातील पाणवठे पक्ष्यांसाठी जास्त संवेदनशील असतात. अंबाझरी तलावाचा परिसर म्हणजे पक्ष्यांसाठी विसाव्याचे ठिकाण आहे. त्याच्या या ठिकाणात बदल होत राहिला तर ते धोकादायक आहे. या परिसरात बोरी, बाभळी, खर, पळस यासारखी झाडे आहे. त्यावर नानाविध पक्ष्यांचे वास्तव्य असते. यात अचानक बदल झाला तर पक्ष्यांनी कुठे जायचे? वेगळ्या प्रकारची जैववैविधता वनखाते निर्माण करेलही, पण ती तयार होईपर्यंत अनेक वष्रे जातील. त्या कालावधित पक्ष्यांचे काय? तिथे पक्षी परत येतील का? असा प्रश्न ‘बर्ड्स ऑफ विदर्भ’चे मार्गदर्शक व ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी उपस्थित केला.