भंडारा-गोंदियातील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव पत्थ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका करीत खासदारकीचा आणि भाजपचा राजीनामा देणारे नाना पटोले यांनी पक्षांतर्गत विरोधाची धार बोथट करीत नागपुरातून उमेदवारी मिळवण्यात बाजी मारली आहे.

शहरातील काँग्रेस नेत्यांचा पटोले यांच्या उमेदवारीला विरोध होता, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आव्हान दिले  तसेच  पोटनिवडणुकीत मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या विजय मिळवून देण्यासाठी मोठा वाटा उचलला  याची कल्पना पक्षश्रेष्ठींना होती. त्याची सरशी होण्यास प्रमुख घटक म्हणजे नागपूर शहरात पक्षात असलेली गटबाजी आणि त्यांचे कुणबी होणे होय. गेल्या पाच वर्षांतील वातावरणामुळे मुस्लीम, दलित, हलबा आणि ख्रिश्चन हा समाज काँग्रसकडे येईल. त्यात नागपुरात बहुसंख्य असलेला कुणबी समाज नाना पटोले यांच्या उमेदवारीमुळे एकवटेल, असा काँग्रेस धुरिणांचा कयास आहे. शिवाय शहरातील  एका गटाला उमेदवारी दिल्यास दुसऱ्या गटात नाराजी वाढण्याची भीती होती. त्यातून मार्ग काढत पक्षश्रेष्ठींनी भंडारा-गोंदिया निवडणुकीत लढवय्या ठरलेल्या नाना पटोले यांना पसंती दिली. त्यांना उमेदवारी मिळू नये म्हणून पक्षातील दोन्ही गटांचा विरोध होता. पण, त्यांच्या नावावर तीन दिवसांपूर्वी शिक्कामोर्तब झाल्यावर त्यांच्याविरोधात अपप्रचार सुरू झाला होता. मात्र, पक्षश्रेष्ठींनी माध्यमातून होत असलेल्या या अपप्रचाराला थारा दिली नाही आणि अखेर पटोले यांना संधी दिली.

मुत्तेमवार यांना डच्चू

माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांना पक्षाने पुन्हा संधी नाकारली. ते १८८० पासून ते २००९ पर्यंत सतत पूर्वीच्या चिमूर आणि नागपुरातून सात वेळा लोकसभेवर गेले होते. त्यांना केंद्रीय मंत्रीपदाची एकदा संधी देखील मिळाली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २००९ च्या लोकसभेत त्यांचा पराभव केला होता. ते तीन वेळा चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर ते १९९८ पासून नागपुरातून सलग चार वेळा विजयी झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत गडकरी यांना ५ लाख ८७ हजार ७६७ मते मिळाली तर विलास मुत्तेवार यांना ३ लाख २९ हजार ९१९ मते मिळाली होती. दोन लाखांहून मतांनी त्यांचा पराभव झाला होता.