लोकसत्ता ऑनलाइन, नागपूर

नागपुरात एका रुग्णाला जमिनीवरुन ओढत फरफटत नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हा प्रकार घडला आहे. स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने नातेवाईकांवर ही वेळ आली. त्यातच निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे एकही डॉक्टर रुग्णाला तपासण्यासाठी बाहेर आला नाही. हा धक्कादाय प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या रुग्णाचे नाव रतन रामटेके असं आहे. त्यांना मानसिक आजार आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईक त्यांना घेऊन प्रादेशिक मनोरुग्णालयात गेले होते. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत होते. यामुळेच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रुग्णालयात पाठवण्यात आले. पण तिथे स्ट्रेचर नसल्या कारणाने नातेवाईकांना रतन रामटेके यांना अक्षरक्ष: जमिनीवर फरफटत न्यावं लागलं.

जवळपास १५ ते २० मिनिटं रतन रामटेके कोणतीही मदत न मिळाल्याने जमिनीवर पडून होते. याचवेळी संप सुरु असल्या कारणाने एकही डॉक्टर त्यांना तपासण्यासाठी रुग्णालयाबाहेर आला नाही. अखेर स्ट्रेचर आल्यानंतर त्यांना आकस्मिक विभागात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली.