‘एम्प्रेस सिटी’ टॉवरच्या तळमजल्यातील एका अपूर्ण विहिरीत काम करताना गुदमरून मरण पावलेल्या तीन मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत मिळावी म्हणून रविवारी एम्प्रेस मॉलमध्ये मृतदेह ठेवून आंदोलन करण्यात आले. सुटीचा दिवस असल्याने मॉलमध्ये येणाऱ्यांची गर्दी होती. मॉलच्या व्यवस्थापकाने मालक उपस्थित नसल्याचे सांगून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे आश्वासन देऊन वेळ मारून नेली. या आंदोलनामुळे गरीब मजुरांचे मृतदेह आणि शॉपिंग करणाऱ्यांची गर्दी असे वास्तवादी चित्र होते.

पाण्याची मोटार बाहेर काढण्यासाठी शनिवारी हे मजूर एकामागून एक उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता. प्लंबर दीपक महादेवराव गवते (४५, रा. सुगतनगर, पॉवर ग्रीड चौक) हे विहिरीत उतरले होते. त्यांचा श्वास कोंडल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांना वाचवण्यासाठी अजय मारोती गारोडी (४५, लाडपुरा, तांडा चौक) आणि चंद्रशेखर जागोबाजी बारापात्रे (४३, नाईक तलाव, बांग्लादेश) हे दोघे विहिरीत उतरले होते. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी मॉलचे मालक प्रवीण तयाल याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आज रविवारी दुपारी बारा वाजतापासून मेडिकल रुग्णालयात तीनही मृतदेहाचे शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती. काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीनही मजुरांच्या नातेवाईकांना मोठी आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता थेट एम्प्रेस सिटी मॉलमध्ये तीनही मृतदेह आणण्यात आले. सुटीचा दिवस असल्याने मॉलमध्ये गर्दी होती. तीनही मृतदेह  प्रवेशद्वाराजवळ ठेवल्यामुळे आणखी गर्दी वाढली. जोपर्यंत मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपये आणि नोकरी देण्याचे लेखी आश्?वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मृत मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्यात येतील आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देखील मदत केली जाईल, असा दावा आमदार विकास कुंभारे यांनी केला.

मॉल बंद

मृतदेह मॉलच्या प्रवेशद्वारासमोर ठेवण्यात आल्याने अनेकांनी खरेदी सोडून मृतदेहाजवळच गर्दी केली होती. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सायंकाळी मॉल बंद करण्यात आला. रविवारी आणि ते देखील सायंकाळी मॉल बंद असल्याचे लक्षात आल्यावर अनेकांचा हिरमोड झाला.