कोथिंबीर, मिरचीचे दर मात्र वाढले

गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात हिरव्या भाज्यांचे भाव वाढलेले होते. त्या तुलनेत यंदा आवक पूरक असल्याने भाव स्थिरावले आहेत. त्यामुळे सर्वसामन्यांसोबतच गृहिणींना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र, कोथिबीरीची आवक मर्यादित असल्याने ते प्रतिकिलो साठ रुपये विकले जात आहे.

उन्हाळा येताच भाज्यांच्या भावात कमालीची वाढ होत असते. पाण्याचा अभाव आणि तापमानात वाढ होत असल्याने शहरालगतच्या गावखेडय़ातून भाज्यांची आवक कमी होत असते. सध्या बाजारात पालक, फुलकोबी, पत्ताकोबी, हिरवी मिरची, मेथी, चवळी, कारले, चवळी शेंगांची आवक जास्त आहे. मात्र, तापमानामुळे कोथिंबीरीची लागवड  करणे कठीण होत असल्याने त्याची आवक कमी असून इतर राज्यातून  कोथिंबीर नागपूरच्या बाजारात येत आहे.  कॉटन मार्केटमध्ये लहान-मोठय़ा ७० तर कळमना बाजारात दीडशे मालवाहू ट्रकची आवक होत असल्याची नोंद आहे. त्यामुळे भाज्यांचे दर स्थिरावले आहेत. टमाटर, कांदा, बटाटा परराज्यातून येत आहे. टमाटर संगमनेर तर कांदा नाशिक येथून येत आहे. तोंडली भिलाई, रायपूर, दुर्ग येथून येत आहे, तर पत्ताकोबी जिल्ह्य़ातून व थोडय़ा प्रमाणात मुलताईवरून येत आहे. उन्हाळ्यात भाज्यांना योग्य चव नसल्याने कडधान्यांची खरेदीही जोरात आहे. भिजवलेली मोट, हिरवा मूग, चना आदी प्रकाराच्या कडधान्याला चांगली मागणी आहे.

शहराच्या तीस-चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खेडय़ागावांतून मोठय़ा प्रमाणात भाजीपाला कॉटन मार्केटमध्ये येत आहेत. मात्र,  गेल्या उन्हाळ्याच्या तुलनेत आवक बरी आहे. त्यामुळे भाव स्थिरावलेले आहेत. उन्हाळ्याच्या शेवटी भाज्यांचे भाव वाढण्याची चिन्हे आहेत.

– राम महाजन, भाज्यांचे ठोक व्यापारी, कॉटन मार्केट