न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने गांधीबाग आणि सतरंजीपुरा झोननधील वाहतुकीस अडथळा ठरलेल्या संवेदनशील धार्मिक  स्थळांवर कारवाई करण्यात आली.

सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील प्रार्थना स्थळांवर कारवाई करताना तेथील लोकांनी विरोध केल्यावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांनी विरोध मोडून काढून कारवाई केली. शुक्रवारी  एकूण १० स्थळांवर कारवाई करण्यात आली.

धार्मिक अतिक्रमणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून  शहरात कळीचा ठरला आहे. काही संवेदनशील स्थळांवर कारवाई करताना वाद होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने त्यांना फक्त नोटीस बजावली होती. या कारवाईला स्थगिती द्यावी म्हणून काही प्रार्थना स्थळांच्या व्यवस्थापनाने न्यायालयाचे दारही ठोठावले होते. मात्र, गुरुवारी न्यायालयाने अतिक्रमित प्रार्थनास्थळे  ४८ तासात हटवावी, असे आदेश दिले. त्यानंतर आज  महापालिकेने सकाळपासून कारवाईला सुरुवात केली. गांधीबाग येथील देवडिया शाळेतील एका प्रार्थना स्थळावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला घेराव घालण्यात आला आणि बुलडोझर रोखण्यात आले. गांधीबाग उद्यानाजवळील कारवाई दरम्यान व्यापाऱ्यांनी विरोध केला. डागा रुग्णालयाजवळील प्रार्थना स्थळावरील कारवाई दरम्यान नागरिक  मोठय़ा प्रमाणात गोळा झाले होते. त्यांनी घोषणा देणे सुरू केले. पोलीस आणि शीघ्र कृती दलाने सर्व ठिकाणी विरोधकांना पिटाळून लावले. गांधीबाग उद्यान, लाल ईमली चौक, नंगा पुतळा, इतवारी रेल्वे स्टेशन, बिनाकी वॉर्ड, बस्तरवारी, प्रेमनगर, लालगंज, मंगळवारी, पंचवटीनगर आणि धम्मदीप नगर या भागातील विविध धर्मातील धार्मिक आणि प्रार्थना स्थळांवर कारवाई करण्यात आली. बस्तरवारी, प्रेमनगर भागातील एका धार्मिक स्थळावर कारवाई करताना तेथील एका राजकीय पक्षाच्या ५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी विरोध केला. पोलिसांनी त्यांना पिटाळून लावल्याने तणाव निर्माण झाला होता.  महापालिकेचे प्रवर्तन विभागाचे अधिकारी अशोक पाटील आणि कोतवाली, तहसील पोलीसमधील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.