News Flash

‘रेमडेसिवीर’साठी रुग्णांची फरफट!

रोज हजारो  रुग्ण आढळून येत आहेत.

संग्रहित छायाचित्र

खासगी रुग्णालय, नियंत्रण समितीकडून हात वर

नागपूर : करोनावर परिणामकारक ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुरवठा नियंत्रण समिती नियुक्त केली असली तरी रुग्णांची फरफट थांबलेली नाही. औषध दुकानातून विक्री बंद असतानाही खासगी दवाखान्यात रुग्णांना बाहेरून इंजेक्शन आणण्यास सांगितले जात आहे, तर याबाबत पुरवठा नियंत्रण समितीकडे तक्रार केल्यास ते रुग्णालयांकडेच उपलब्ध असल्याचे सांगून हात वर करीत आहेत.

करोनाची साथ जोरात आहे. रोज हजारो  रुग्ण आढळून येत आहेत. दैनंदिन मृत्यूसंख्याही आता ७३ पर्यंत पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर करोनावर परिणामकारक ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार वाढला. ही बाब लक्षात आल्यावर दोनच दिवसांपूर्वी  जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी औषध दुकानातून या इंजेक्शनची विक्री बंद केली व पुरवठा आणि वाटप सुरळीत ठेवण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची समिती नेमली. त्यात एक अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांचा समावेश आहे. तसेच इंजेक्शन थेट कोविड रुग्णालय किंवा तेथील औषध दुकानात उपलब्ध करून देण्याची सोय केली.

यासोबतच इंजेक्शनचा पुरेसा साठाही उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला. ही  व्यवस्था अंमलात आणल्यावर करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टर्सनी तेथील रुग्णांना इंजेक्शन बाहेरून आणायला सांगणे अपेक्षित नाही. तसेच उपलब्धतेबाबत काही तक्रार असेल तर समितीने ती सोडवणे गरजेचे आहे. मात्र सध्या दोन्ही पातळीवर सध्या टोलवाटोलवी केली जात आहे. आताही खासगी दवाखान्यातून रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन बाहेरून आणायला सांगितले जातच आहे. काही जणांनी याबाबत पुरवठा नियंत्रण समितीकडे तक्रार केली तर अन्न व औैषध प्रशासन विभागाचे अधिकारी संबंधित रुग्णालयातच इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे, त्यांनाच मागा असे सांगत आहेत. अशात ज्यांना या इंजेक्शनची गरज आहे त्या रुग्णांची नुसती धावाधाव सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी दवाखान्याकडून जाणीवपूर्वक रुग्णांना बाहेरून इंजेक्शन आणण्यास सांगितले जाते. ते मिळाले नाही तर अधिक पैसे घेऊन उपलब्ध करून दिले जाते. यावर अद्याप कोणाचेच नियंत्रण नाही. तसेच अनेक ठिकाणी के वळ सी.टी. स्कॅन के लेल्या रुग्णांना रेमडेसिवीर दिले जात असल्याच्याही तक्रारी आहेत.  खासगी रुग्णालयातील या इंजेक्शनचा अनावश्यक वापरही वाढला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना वरील बाबीची माहिती देण्यात आली. हा प्रकार थांबवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दलाल सक्रिय, काळाबाजार थांबवा-  आ. खोपडे

खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जात नाही. औषध विक्रे ते व अनेक दलाल यात सक्रिय असून मोठा काळाबाजार  होत आहे. त्यामुळे काळाबाजार थांबवून इंजेक्शन उपलब्ध करून द्या, अशी मागणी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चेदरम्यान केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:01 am

Web Title: remdesivir injection shortage in nagpur akp 94
Next Stories
1 परदेशी विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन पेट’चा पर्याय
2 प्रेयसीच्या हत्येप्रकरणी प्रियकरास जन्मठेप
3 खासगीत रेमडेसिवीर नाही, शासकीय रुग्णालयात दाखल करा
Just Now!
X