मुख्यमंत्री सचिवालयाचा सेंटर पॉईंट शाळेला इशारा

नागपूर : करोनामुळे आधीच अनेक पालक आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. हे माहीत असूनही शुल्कासाठी पालकांना मानसिक त्रास देणाऱ्या सेंटर पॉईंट शाळा प्रशासनाला मुख्यमंत्री सचिवालयाने  शासनाकडून निर्देश येईपर्यंत कुठल्याही शाळेवर कारवाई करू नका, तसे केले तर याद राखा, असा कठोर इशारा दिला आहे.

५ फेब्रुवारीपर्यंत शुल्क भरा अन्यथा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग बंद करू, असे पत्र सेंटर पॉईंट शाळेने पालकांना पाठवले. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड रोष असून करोनासारख्या जागतिक महामारीमध्येही शाळा पालकांना सातत्याने मानसिक त्रास देत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यासाठी राष्ट्रीय शिक्षक पालक संघटनेचे योगेश पाथरे यांच्या नेतृत्वात पालकांनी शिक्षण उपसंचालक, जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री सचिवालयाला निवेदन दिले. करोनामुळे पालकांची आर्थिक स्थिती ढासळली असल्याने शाळेचे यावर्षात शुल्कामध्ये सवलत द्यावे, नियमाबाहेरील शुल्क रद्द करावे अशा विविध मागण्या यात केल्या आहेत. याशिवाय पालकांनी याआधी दरवर्षी शाळेमध्ये नियमित शुल्क जमा केले आहेत. यापूर्वी कधीही शुल्कासाठी शाळांना आम्ही साकडे घातले नाहीत. मात्र, यंदा आर्थिक स्थिती ढासळल्याने शाळा प्रशासनाने पालकांचा थोडा विचार करावा, शुल्कामध्ये सवलत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनाकडून कुठलेही निर्देश येईपर्यंत शुल्क वसुलीसाठी तगादा लावल्यास शाळेवर कारवाई करण्याचे आश्वासन  मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्यांनी  पालकांना दिले. तसेच पत्रही निर्गमित करण्यात येणार आहे. याशिवाय पालकांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेत सेंटर पॉईंट शाळेविरोधात निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही शाळा प्रशासनाला फोन करीत वर्ग बंद न करण्याच्या सूचना दिल्या.

उपसंचालकांकडून उडवाउडवीची उत्तरे

सेंटर पॉईंट शाळा आणि स्वामीनारायण शाळेच्या शुल्कासाठी ऑनलाईन वर्ग बंद करण्याच्या धोरणाविरोधात पालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांची भेट घेत निवेदन दिले. मात्र, जामदार यांनी पालकांना उडवाउडवीची उत्तरे देत निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला. त्यामुळे शिक्षक विभाग आणि शाळांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोपही पालकांकडून करण्यात आला आहे.