• गिरीश महाजन यांचे मत
  • आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अनेक डॉक्टरांची राज्यातील दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देण्याची मानसिकता नसल्यामुळे गावातील लोकांना वैद्यकीय सुविधा मिळत नाही. भावी डॉक्टरांनी सामाजिक मूल्य आणि बांधीलकी जोपासत ग्रामीण आणि आदिवासी भागात काम करण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक युवा महोत्सव ‘स्पंदन २०१७’च्या उद्घाटन प्रसंगी गिरीश महाजन बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ चित्रपट अभिनेते डॉ. मोहन आगाशे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ, दिलीप म्हैसेकर, प्रकुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, प्रकुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण आयोजन समितीच्या मनीषा कोठेकर आदी  उपस्थित होते.

डॉक्टरांनी ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी तयार असले पाहिजे. ज्या भागामध्ये रस्ते, वीज, वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही अशा भागात भावी डॉक्टरांनी जाऊन सेवा देण्याचा संकल्प करावा. अवयवासाठी असंख्य रुग्ण प्रतीक्षेत असताना अवयव दानाच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात समाज जागृतीची गरज आहे. राज्यात स्तन कर्करोगाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे शासनाने विशेष अभियान राबवून अडीच कोटी महिलांची अद्ययावत उपकरणाच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. लठ्ठपणामुळे आजार वाढले असून त्या संदर्भात जनजागृती अभियान राबविले जात आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाची संपर्ण प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. गुणवत्तेच्या धारावरच यापुढे केंद्रीय वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. विविध वैद्यकीय महाविद्यालयाच्या संपूर्ण प्रवेश प्रक्रिया तसेच शुल्क आकारणीसंदर्भात समानता आणून सामान्य विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण सहजपणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. यापुढे वैद्यकीय शाखेत प्रवेशासाठी क्लिष्ठता राहणार नाही. सुलभपणे सर्वाना प्रवेश घेता येईल अशी यंत्रणा निर्माण करण्यावर भर राहणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे, त्यामुळे प्रत्येकाने अंगी असलेल्या कलागुणांचा विकास करावा, असा सल्ला महाजन यांनी दिला.

वैद्यकीय शिक्षण घेताना आपल्यातील कलागुणांचा विकास व्हावा त्यादृष्टीने त्याला वेळ देऊन कलेविषयीच्या संवेदना जागृत करा, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी केले. वैद्यकीय शिक्षण घेताना जशी अभ्यासाची तयारी करीत असतो तशीच तयारी कलेची केली पाहिजे. कला वृद्धिंगत करण्यासाठी रियाझची आवश्यकता असते, मात्र तो करताना त्यात निष्ठा आणि प्रामाणिकता असली पाहिजे. कला ही माणसाला जीवन जगायला शिकविते. निरोगी जीवन जगण्यासाठी कलेची साथ सोडू नका. स्पंदन म्हणजे कलाकारांच्या अंगभूत कलागुणांचा उत्स्फूर्त अविष्कार. डॉक्टरांनी तणावातून मुक्त व्हावे आणि त्याच्या कलेतून येणारी ऊर्जा रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू फलविण्यासाठी उपयोगी पडावी यासाठी हे व्यासपीठ आहे. अभ्यासाप्रमाणे कलेवरही प्रेम करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. दिलीप म्हैसेकर यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनीषा कोठेकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. डॉ. कालिदास चव्हाण यांनी आभार मानले.