News Flash

अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेले पथक माघारी

बंधित मंदिरासंदर्भातील कागदपत्रे मागितली असून ती त्यांना देण्यात येणार असल्याचे तळवेकर यांनी सांगितले.

  वनदेवी नगरात अतिक्रमण कारवाईच्यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेला पोलिसांचा बंदोबस्त. (लोकसत्ता छायाचित्र) 

पूर्व नागपुरात वनदेवीनगरात नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर अनधिकृत झोपडय़ा आणि एका धार्मिक स्थळाची निर्मिती केली असताना ते पाडण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण पथकाला आणि पोलिसांना परिसरातील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आणि कारवाई न करता पथकाला परतावे लागले.

वनदेवीनगर, भिलगाव रोड, वांजरा, टिपू सुलतान चौक, यशोधरानगर यासह अनेक वस्त्यांमध्ये नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंडावर मोठय़ा प्रमाणात लोकांनी अतिक्रमण केले असून त्या ठिकाणी घरे बांधण्यात आली आहेत. वनदेवीनगरात मौजा वांजरी नासुप्रच्या खुल्या भूखंडावर गेल्या दोन वर्षांपासून एक झोपडे बांधून त्या ठिकाणी धार्मिक स्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार अनधिकृतपणे भूखंडावर धार्मिक स्थळे उभारली जात असतील तर ती पाडण्याचे आदेश असल्यामुळे आज सकाळी नासुप्रचे पथक वनदेवीनगरात पोहचले. परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. घटनास्थळाकडे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. दरम्यान, धार्मिळ स्थळ पाडण्याची कारवाई बुधवारी सकाळी सुरू होणार असल्याची माहिती आधीच परिसरातील नागरिकांना मिळाली असल्यामुळे हजारो लोक सकाळपासून मंदिर परिसरात ठाण मांडून बसले होते. कुठल्याही परिस्थितीत मंदिर पाडले जाऊ देणार नाही, असा इशारा देत शिवसेना, बजरंगदल, भाजयुमोचे कार्यकर्ते जमा झाले होते. मंदिराच्या भोवती कार्यकर्त्यांचा गराडा होता. अनेक महिला-पुरुष भजन करीत बसले असताना त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. कारवाई सुरू करण्याच्या आदेशाची वाट पाहत बसले असताना पोलीस अधिकाऱ्यांनी नासुप्रचे प्रभारी सभापती आणि जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तूर्तात कारवाई करण्यात येऊ नये असे आदेश दिले आणि अतिक्रमण पाडण्यासाठी आलेले पथक कारवाई न करता आल्या पावली परत गेले व जमाव शांत झाला. या संदर्भात नगरसेवक बंडू तळवेकर म्हणाले, या धार्मिक स्थळाची जागा मंदिर व्यवस्थापनाला देण्यात यावी यासाठी नासुप्रला निवेदन देण्यात आले होते. ही जागा मंदिरासाठी राखीव असून विभागीय अधिकाऱ्यांना तसे निवेदन देण्यात आले होते. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. कारवाई थांबविण्यात आली असली तरी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. त्यांनी संबंधित मंदिरासंदर्भातील कागदपत्रे मागितली असून ती त्यांना देण्यात येणार असल्याचे तळवेकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 3:00 am

Web Title: removing the encroachments team return in nagpur
टॅग : Nagpur
Next Stories
1 ‘सायकल पोलो’तील राष्ट्रीय खेळाडूच्या हाती चरितार्थासाठी ऑटोरिक्षा !
2 तीनवेळा निवडणुका जिंकणाऱ्या भाजप नगरसेवकांना विश्रांती?
3 झोपडपट्टय़ांमध्ये ‘एसआरए’; सर्वासाठी घरे योजनेला पर्याय
Just Now!
X