मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गत अजब प्रकार

विहीर चोरीला गेल्याची तक्रार करताना मकरंद अनासपुरे यांना आपण एका चित्रपटात बघितले आहे. या चित्रपटाने लोकांचे मनोरंजनही केले. पण, आता उपराजधानीत रस्ताच चोरीला गेल्याची तक्रार घेऊन एक व्यक्ती मानकापूर पोलीस ठाण्यात पोहोचली. या तक्रारीवर हे काय नवीन, असे म्हणत पोलिसांनीही कपाळावर हात मारून घेतला.

भारतीयनगर परिसरात म्हाडाने १९९५ मध्ये वसाहत बांधली. तेथे १२ मीटर रूंद रस्ता असल्याची नोंद नकाशात होती. हा रस्ता तयार करण्याची मागणी वेळावेळी वसाहतीतील रहिवाशांनी प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांकडे केली. लवकरच रस्ता तयार होईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. याचदरम्यान या रस्त्यावर अतिक्रमण करून भिंत बांधण्यात आली. प्रशासन व नेत्यांकडे तक्रार करूनही रस्ता होत नसल्याने रहिवासी हताश झाले. बहुउद्देशिय सेवा अ‍ॅण्ड वेलफेअर संस्थेचे सचिव आर. बी. वानखेडे यांच्या नेतृत्वात वसाहतीतील रहिवाशांनी गुरुवारी मानकापूर पोलीस ठाणे गाठून रस्ता चोरीची तक्रार दिली. रस्ता चोरीची तक्रार कशी घ्यावी, असा प्रश्न पोलिसांना पडला. १९९५ मध्ये मंजूर नकाशा आज अस्तित्वात नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. त्याचे दस्तऐवजही दाखवले. नागपूर सुधार प्रन्यास व म्हाडाकडे निवेदन देण्यात आली. पण, प्रशासनाने निवेदनाला केराची टोपली दाखवली. १९९५ मध्ये मंजूर रस्ता नकाशात नसल्याचेही रहिवाशांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिले. पोलिसांनी तक्रार घेऊन ठेवली. आता त्या तक्रारीवर नेमकी कोणती कारवाई करायची, असा पेच पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.