काँग्रेस मते रोखण्यासाठी गटांची मोट

कामठीची पुनरावृत्ती नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत होऊ नये म्हणून आंबेडकरी मतांचे विभाजन ‘रिपब्लिकन फ्रन्ट’च्या माध्यमातून करण्याची व्यूहरचना आखण्यात आली असून या योजनेला भाजपची फूस असल्याची माहिती हाती आली आहे. एकेकाळी महापालिकेच्या सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावणारा रिपब्लिकन पक्ष अनेक गटातटात विखुरला गेला आहे. यामुळे आंबेडकरी मते बसप आणि काँग्रेसला मिळू लागली आहेत. काँग्रेसच्या मतांचा ओघ रोखण्यासाठी रिपब्लिकन गटांची मोट बांधण्याची योजना आखली आहे.

भाजप आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंच (बरिएमं) यांनी संयुक्तपणे कामठी नगरपरिषदेची निवडणूक लढवली. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस लढत  झाली. काँग्रेसला दलित, मुस्लिम आणि बहुजन मतदारांनी कौल दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शक्ती पणाला लावूनही यश आले नाही. यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण असून कुठल्याही परिस्थितीत कामठीची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्याने रिपब्लिकन फ्रन्ट स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून केवळ चर्चा असलेली फ्रन्ट १२ गटांसह स्थापन झाली आहे.

नागपूर महापालिकेत भाजप सलग दहा वर्षे सत्तेत आहेत. विकासाचा मुद्यांवर निवडणूक लढवण्यासोबत जाती-धर्माच्या आधारावर मतांचे धृवीकरण भाजपला हवे आहे. सत्ताधाऱ्याविरोधात मतदारांमध्ये स्वाभाविक नाराजी असते. हे मत देखील काँग्रेसच्या पारडय़ात जाणार नाही. यासाठी भाजपचे वेगवेगळ्या भागात डमी उमेदवार देता येतील काय, याबाबत चाचपणी सुरू केली आहे.

कामठीच्या निकालाने भाजपची चिंता वाढली असून आंबेडकरी आणि मुस्लीम मतदारांचे अधिकाधिक विभाजन करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रिपब्लिकन फ्रन्टकडे बघण्यात येत आहे.

कामठीमधील आंबडेकरी मतदारांची संख्या लक्षात घेऊन भाजपने बरिएमंला सोबत घेतले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. महापालिका निवडणुकीत भाजप सोबत बरिएमं आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा गट भाजपशी जवळीक साधून आहे. बसपा आणि भारिप बहुजन महासंघ स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे.

बसपाकडे हत्ती आणि निळा झेंडा असलातरी महाराष्ट्रातील आंबेडकरी मतदार रिपब्लिकन पर्याय नसल्यास बसपाकडे वळतो.

शिवाय या मतदाराला काँग्रेस पक्ष दगडापेक्षा  (भाजप-शिवसेना) वीट (काँग्रेस-राष्ट्रवादी) मऊ वाटते. यामुळेच या मतांचे विभाजन व्हावे म्हणून रिपब्लिकन फ्रन्टला भाजपची फूस आहे.

‘वह खरीददार कैसे हो सकता’

रिपब्लिकन पक्षाच्या गटातील कुणीही प्रयत्न करत असेलतर स्वागतार्ह आहे. परंतु त्यासाठीचे प्रामाणिक प्रयत्न असले  पाहिजे. रिपब्लिकन फ्रन्ट म्हणजे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लोकांना भुलविण्याचा हा प्रकार आहे. निवडणुकीनंतर हेच लोक प्रायोजकाच्या बाजूने काम करत राहतील, असे सांगून ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी, ‘तुमको बाजार का दुस्तर कैसे समजाऊ, बिक गया जो खरीददार कैसे हो सकता’ अशी मार्मिक टिप्पणी केली.

२०१२ च्या निवडणुकीत आंबेडकरी पक्षाचे संख्याबळ

* बसपा-१२

*     भारिप बहुजन महासंघ-०२

*     बरिएमं-०१

*     रिपाइं (आठवले)-०१

*     या निवडणुकीत सर्वाधिक १ लाख ९५ हजार मते बसपला मिळाली होती.