News Flash

संतप्त नागरिक, हतबल प्रशासन

आठ तरुणांच्या बुडण्याची माहिती समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखी पसरली.

Vena river drowned tragedy,
तलावाच्या परिसरात जमलेले नागरिक

शोध मोहीम अपूर्ण, तलाव परिसरात हजारोंचा जमाव

आठ जणांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर नागपूर आणि परिसरातील हजारो नागरिक वेणा तलाव परिसरात गोळा झाले होते. मात्र, मृतदेह शोधण्यासाठी प्रशासनाला बरेच परिश्रम घ्यावे लागले आणि मृतदेह सापडत नसल्याने परिसरातील लोकांच्या धर्याचा बांध फुटू लागला. शेवटी नागरिक संतप्त झाले होते, तर दुसरीकडे प्रशासनही हतबल झाले होते.

आठ तरुणांच्या बुडण्याची माहिती समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर रविवारी रात्री १० वाजेपासूनच तरुणांचे नातेवाईक तलाव परिसरात जमले. रात्री शोधमोहीम थांबणार असल्याचे समजताच ते घरी परतले. त्यानंतर पहाटे ५ वाजेपासून पुन्हा घटनास्थळी पोहोचले. या तलावातील हा सर्वात मोठा अपघात असल्याने शेजारच्या गावांमधूनही हजारो नागरिक तेथे जमा झाले. सकाळी ८ वाजता शोधमोहीम सुरू झाली. पहिला मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले मात्र, उर्वरित मृतदेह सापडत नव्हते. जसजसा वेळ जाता होता, तसतसा मृतांच्या नातेवाईकांच्या संयमाचा बांध सुटू लागला. पेठचे माजी सरपंच मोहन खांदारे यांचा मुलगा अक्षय बुडाल्याने गावकरी संतप्त झाले होते. त्यामुळे प्रशासनावर अवलंबून न राहता गावकऱ्यांनीच तीन नाव तलावात सोडल्या व अक्षय व रोशन खांदारेचा शोध सुरू केला.

संतप्त नागरिकांना शांत करण्यासाठी व व्यवस्था पाहणीसाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर कोहळे, आमदार प्रकाश गजभिये, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, राजकीय पुढाऱ्यांच्या प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असताना नागरिक अधिकच संतप्त होत होते. त्यामुळे पुढाऱ्यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला व यंत्रणा पुन्हा कामाला लागली.

शोधमोहिमेवर ग्रामीण पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपअधीक्षक सुरेश भोयर व सावनेरच्या उपविभागीय अधिकारी भोसले लक्ष ठेवून होते. पाण्याखाली जाऊन मृतदेह शोधणारी यंत्रणाच नागपुरात उपलब्ध नसल्याची माहिती मिळाल्यानंतर मृतांचे नातेवाईक संजय मारोतराव आमडे, गणेश चोपडे, गणेश खांदारे, गजानन खांदारे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी पुढाऱ्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये ‘बाईट’ देणे किंवा छायाचित्रण करण्यापेक्षा नागरिकांचे दु:ख लक्षात घेऊन व्यवस्था निर्माण करावी, अशा भावना व्यक्त केल्या. लोकांच्या भावनांपुढे प्रशासनही हतबल झाले होते. मात्र, प्रशासनाने आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि सायंकाळपर्यंत ७ मृतदेह शोधण्यात यश आले होते. उर्वरित अतुल भोयर याचा मृतदेह शोधण्याचे काम प्रगतिपथावर होते.

८० वर पोलीस, एसडीआरएफ आणि इतर

या बचाव कार्य व मृतदेह शोधमोहिमेत ग्रामीण पोलीस दलातील ४० अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी होते, तर त्याशिवाय एसडीआरएफ, राष्ट्रीय अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालय आणि महापालिकेच्या पथकाचे एकूण ४० वर कर्मचारी त्यांना मदत करीत होते. त्याशिवाय कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका व कर्मचारी घटनास्थळी होते.

पाण्याखाली जाणारे खासगी पथकही तैनात

दुपापर्यंत मृतदेह सापडत नसल्याने प्राणवायूचे बंब घेऊन पाण्याखाली जाऊन मृतदेह शोधू शकतील, असे पथक केवळ पुणे येथील एनडीआरएफकडे आहे. नागपुरात तशी यंत्रणा नाही. मात्र, नौदलातून सेवानिवृत्त झालेले कमांडंट एस.एस. नाथन यांची स्वत:ची तशी यंत्रणा आहे. त्यांच्याकडे स्कूबा ऑक्सिजन सेट ही यंत्रणा असून त्यामध्ये एनसीसीचे माजी कॅडेट अक्षय ढोबले आणि महेश लाडके यांच्यासह इतर तरुण पाण्याखाली जाऊन मृतदेह शोधण्याचे काम करू शकतात. त्यांनाही प्रशासनातर्फे घटनास्थळावर बोलविण्यात आले होते.

एक मृतदेह पाण्यातच, आज शोधणार

सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत जलाशयात बुडालेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरूच होते. या दरम्यान सात मृतदेह बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले. मात्र अतुल भोयरचा मृतदेह अजूनही पाण्याखालीच आहे. त्याचा उद्या, मंगळवारी सकाळी सात वाजतापासून शोध घेण्यात येणार आहे. दरम्यान, पाण्यात बुडालेली नाव संध्याकाळी सापडली.

 

सर्वतोपरी सहकार्य, घटनेची चौकशी

ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. घटनेत दगावलेले आणि इतर जखमींना प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. मात्र, हा तलाव मासेमारीकरिता असून तो पर्यटनासाठी नाही. त्यामुळे मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या नावेत बसून तरुण तलावाच्या आतमध्ये गेले होते. हा प्रकार अतिशय गंभीर आहे, त्यामुळे घटनेची चौकशी करण्यात येईल. इतर तलावांमध्येही असेच प्रकार समोर येत असल्याने जिल्ह्य़ातील तलावांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपण संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहोत. मात्र, तलावात खूप गाळ असल्याने मृतदेह शोधायला थोडा उशीर होत आहे. परंतु, बचाव पथक पूर्ण शक्तीनिशी कार्य करीत असून अधिक मदत लागल्यास पुण्याहून एनडीआरएफच्या चमूलाही पाचारण करण्यात आले आहे.

– चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2017 3:08 am

Web Title: rescue operations continue in vena river near nagpur
Next Stories
1 स्मार्ट सिटीचा बाजार रस्त्यावर
2 नवीन दप्तर घेऊन दिले नाही म्हणून मुलाची आत्महत्या
3 राज्यातील ७६ हजारांवर शासकीय कार्यालयांकडे वीज देयकांचे २ हजार, ७३९ कोटी थकित
Just Now!
X