23 April 2019

News Flash

विश्वेश्वरय्या संस्थेच्या संशोधनांमुळे रुग्णांना फायदा

येथील विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन वैद्यकीय क्षेत्रासाठी वरदान ठरत आहे.

व्हीएनआयटीमध्ये तयार करण्यात आलेले कानाच्या मागील कृत्रिम हाड

नागपूर : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) ही देशातील आघाडीची शैक्षणिक संस्था आहे. येथील विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन वैद्यकीय क्षेत्रासाठी वरदान ठरत आहे. अस्थिरोग, कान नाक घसा, हृदय, दंत, रक्तदाब यासंबंधी आवश्यक उपकरणांबाबत  येथील विद्यार्थ्यांनी जे नवनवीन प्रयोग केलेत ते डॉक्टर आणि रुग्णांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत.

या विद्यार्थ्यांच्या संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्रातील शस्त्रक्रियांवेळी, कमी भूल देणे, कालावधी, रक्त पुरवठा किंवा शरीरात लागणारी विविध उपकरणे आता उपराजधानित मिळणे शक्य झाले असून त्यामुळे रुग्णाचा बराच मोठा खर्च वाचत आहे.

दीड एक वर्षांपूर्वी विष प्राशन केलेला शेतकरी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता.  कारण त्यांची श्वसनलिका जळून अकुंचन पावली होती. रामदासपेठेतील कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. मदन कापरे यांनी त्यांची गरज व्हीएनआयटीला कळवली आणि निधीही उपलब्ध करून दिला. व्हीएनआयटीने इंग्रजी टी अक्षरासारखी ट्रकेल टय़ुब तयार करून दिली आणि शेतकऱ्याचे प्राण वाचले.

व्हीएनआयटी संचालक डॉ. प्रमोद पडोळे आणि त्यांच्या विद्यार्थिनी प्राध्यापक डॉ. रश्मी उद्दानवाडीकर अशा लोकांच्या मदतीसाठी धडपडत असतात.

डॉ. उद्दानवाडीकर यांच्या मार्गदर्शनात एम.टेक.चा विद्यार्थी शुभम रामटेकेने ही टी- टय़ुब बनवली होती. दुसरे म्हणजे नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी वैद्यकीय अवजारे फारच विचित्र आणि डॉक्टरांचा कस लावणारी असतात. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा चिमटा निखिल अढे, अद्वैत इनामदार आणि सौरभ शेंडे या विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रकल्पादरम्यान तयार केला. तशी मागणी डॉ. सुभाष लुले यांच्याकडून आली होती. डॉक्टरांना यामुळे नाकावर शस्त्रक्रिया करणे सोपे झाले आहे. स्नायूंची क्षमता मोजण्याच्या दृष्टीने केतन चेतन कुथे या विद्यार्थ्यांने संशोधन केले. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अलंकार रामटेके यांनी तशी मागणी व्हीएनआयटीला केली होती. याशिवाय रक्तदाब मोजण्याचे अ‍ॅप आणि डायलिसिससाठी उपयोगी पडणारे विशिष्ट आकाराचे छोटे उपकरणही व्हीएनआयटीमध्ये बनवण्यात आले आहे. अशा प्रकारची जवळपास २५ संशोधने व्हीएनआयटीमध्ये करण्यात आली आहेत. यासंबंधी एक बायो-मेडिकल फोरमच काही वर्षांआधी व्हीएनआयटीमध्ये स्थापन करण्यात आले असून उपराजधानीतील अनेक डॉक्टर या फोरमचे सदस्य आहेत. त्यांना लागणाऱ्या उपकरणांची गरज अभियांत्रिकीचे कौशल्य वापरून व्हीएनआयटीतील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांकडून करवून घेतले जाते.

दरवर्षी वेगवेगळ्या वैद्यकीय उपकरणांसाठी १५ डॉक्टर व्हीएनआयटीकडे विचारपूस करतात. वैद्यकीय क्षेत्रातून येणारी मागणी नावीन्यपूर्ण आणि आव्हानास्पद असते. अभ्यास खूप करावा लागतो. वैद्यकीय क्षेत्राला उपयोगी पडतील अशा अनेक संशोधनांवर आम्ही पेटंटसाठी अर्ज केले आहेत. खरे तर हे विद्यार्थ्यांचे यश आहे. विद्यार्थी भरपूर असतात पण, सर्वाचे संशोधन इंडियन पेटंट जर्नलमध्ये प्रसिद्ध होत नाहीत. केलेले संशोधन सामान्य माणसांच्या उपयोगी पडते त्याचे सर्वाधिक समाधान वाटते.

– डॉ. रश्मी उद्दानवाडीकर, प्राध्यापक, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, व्हीएनआयटी

२००३मध्ये आम्ही दंत क्षेत्रातील संशोधन डॉ. रश्मी उद्दानवाडीकर यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली सुरू केले. नागपुरातील अनेक नामवंत डॉक्टर्स यांच्या सहकार्यातून आम्ही २०१३मध्ये बायो- मेडिकल फोरम सुरू केले. त्यांच्याच गरजेतून वैद्यकीय क्षेत्राला लागणारी उपकरणे आम्ही तयार केली. डॉक्टरांबरोबरच रुग्णांनाही त्याचा उपयोग होत आहे. ‘बायो-मेडिकल सेंटर फॉर एक्सलन्स’सुरू करण्याचा विचार सुरू आहे. त्याचा उपयोग निश्चित अभियांत्रिकीचे विद्यार्थी, संशोधक व डॉक्टरांना होईल. भारतीय वातावरणात साजेसे तंत्रज्ञान यशस्वी होते तसेच त्याची किंमतही कमी होते, असा आमचा अनुभव आहे.

– डॉ. प्रमोद पडोळे, संचालक, व्हीएनआयटी

वैद्यकीय क्षेत्रात सराव करीत असताना आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, बायो-मेडिकल फोरम आमच्या समस्या मांडण्याचे आणि त्यांची सोडवणूक करण्याचे एकमेव व्यासपीठ आहे. शिवाय मनात जे काही नावीन्यपूर्ण आणि अस्तित्वात असलेल्या उपकरणांमध्ये बदल घडवून आणणे फोरममुळे शक्य झाले. गेल्या चार वर्षांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांना सुसह्य़ ठरणारे अनेक प्रकल्प आम्ही फोरमच्या माध्यमातून हाती घेतले आणि ते यशस्वीरीत्या पूर्ण केले.

– डॉ. सुभाष लुले, कान नाक घसा तज्ज्ञ व सदस्य, बायो- मेडिकल फोरमच

First Published on August 11, 2018 2:33 am

Web Title: research by visvesvaraya national institute of technology benefit to patients