डॉ. संजय वाघ यांची ‘लोकसत्ता’ भेटीत खंत

अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखांकडे विद्यार्थ्यांचा कल  असतो, तेवढा संशोधनाकडे नसतो. त्याला राजकीय अनास्थाही कारणीभूत आहे. कारण नेत्यांनी जेवढी अभियांत्रिकी, व्यवस्थापनाची महाविद्यालये काढली, त्या तुलनेत संशोधन संस्था उभ्या न केल्याने विदर्भात संशोधनाला चालना मिळाली नाही. मूलभूत संशोधन व्हावे, यासाठी फारसे कोणी प्रयत्न केले नाहीत, अशी खंत सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिटय़ूटचे (सीआयआरआय) संचालक डॉ. संजय वाघ यांनी व्यक्त केली. ‘लोकसत्ता’ला दिलेल्या सदिच्छा भेटी दरम्यान त्यांनी वैदर्भीय संशोधनाच्या तऱ्हा, आईनस्टाईनचा सापेक्षतावाद, जोशी इफेक्ट, ब्लॅक होल  आणि स्टीफन हॉकिंगचे आदर्श व्यक्तिमत्त्व यावर चर्चा केली.

ते मूळचे अमरावतीचे आहेत. पदव्युत्तर विज्ञान शिक्षण त्यांनी नागपुरातून घेतले तर ‘ब्लॅक होल अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’वर त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. खगोलशास्त्र आणि खगोलभौतिक आंतरविद्यापीठ केंद्र (आयुका) सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेत शिक्षण घेतलेल्या डॉ. वाघ यांनी नुकतीच ‘भौतिक विश्व’ या विषयाला धरून आंतरराष्ट्रीय परिषद नागपुरात आयोजित केली होती.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी विश्वोत्पत्तीतील अनेक समज गैरसमज यानिमित्त दूर केले होते. भौतिक विश्वाच्या निर्मितीचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून शोध घेणारे स्टीफन हॉकिंग यांच्या निधनाने अस्वस्थ झालेल्या डॉ. वाघ यांनी त्यांच्या आठवणींना यानिमित्त उजाळा दिला. जगातील संशोधनाच्या तुलनेत विदर्भ कुठे? या विषयावर बोलताना डॉ. वाघ म्हणाले, विदर्भात सांख्यिकी  क्षेत्रातील डॉ. एस.एस. श्रीखंडे, टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील राजीव गवई, सी-डॅकचे निर्माते विजय भटकर आदींसारखे शास्त्रज्ञ आहेत. तरीही विदर्भातच काय उपराजधानी म्हणवणाऱ्या नागपुरात अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा व्यवस्थापनाच्या संस्था उभ्या राहिल्या. मात्र, संशोधनाला चालना मिळावी, आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाच्या क्षेत्रात नागपूरची ओळख निर्माण व्हावी, अशा संस्था उभ्या राहिल्या नाहीत.

संशोधनाच्याबाबतीत पालक आणि प्राध्यापकांच्या पातळीवरही अनास्था आहे. संशोधन करून काय करणार? असे प्रश्न विचारून ही मंडळी विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करतात. पालकांचा दोष नसतो. त्यांच्यातील संशोधनासंबंधीचे अज्ञान एक कारण सांगता येईल, पण विज्ञान क्षेत्रातील प्राध्यापकही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत नाहीत, याविषयी डॉ. वाघ यांनी चिंता व्यक्त केली. विदर्भात संशोधनाच्या क्षेत्रातील वानवा ओळखूनच त्यांनी १९९३-९४मध्ये सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिटय़ूटची (सीआयआरआय) स्थापना केली. खगोल भौतिकवर कमी खर्चात जास्त संशोधन करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय संस्था, वैज्ञानिकांशी सतत संपर्क आणि हल्ली सर्वकाही इंटरनेटच्या माध्यमातूनच नवीन संशोधन उपलब्ध होत असल्याने नागपुरात राहूनही बाहेरच्या जगाशी संपर्क तुटल्याची भावना निर्माण होत नाही. त्यामुळे नागपुरातही संशोधन होणे शक्य असल्याचे ते म्हणाले.

दुसरे म्हणजे, विज्ञानाची मुलांना गोडी लागेल, असे उपक्रम फारसे राबवले जात नाहीत. आपली शिक्षण पद्धत परीक्षा केंद्रित असल्याने केवळ नोटस् वाचून गुण मिळवण्याची मानसिकता वाढली आहे. त्यामुळे संशोधनावर फार कमी बोलले, वाचले जाते.

अशा या अनास्थेच्या वातावरणात स्टीफन हॉकिंगसारखा शास्त्रज्ञ सर्वसामान्यांना विज्ञानाच्या दिशेने घेऊन जात होता. बोस्टर्न येथील विज्ञान संग्रहालयात त्यांचे भाषण असताना त्याठिकाणी अनेक अपंगांनी हजेरी लावली होती. त्यांच्यासाठी स्टीफन आदर्श होता. त्यामुळे स्टीफन यांचे ज्या ज्या ठिकाणी भाषण राहायचे त्या त्या ठिकाणी ते हजेरी लावायचेच. अपंगत्वावर मात करून स्टीफनच्या असामान्य कामगिरीमुळे त्यांना फार ऊर्जा मिळायची, ती शब्दातीत असल्याचे डॉ. वाघ यांनी आवर्जून सांगितले.

संशोधनाचे पुढे नेण्याचे काम सुरू

रामन इफेक्ट एवढाच आपल्याकडील जोशी इफेक्ट महत्त्वाचा आहे. डॉ. जोशी यांनी १९४०मध्ये केलेल्या संशोधनाला ‘जोशी इफेक्ट’  नाव दिले होते. त्यावर १९७० पर्यंत त्यावर चांगले संशोधन झाले. ज्या पद्धतीने रामन इफेक्टची सैद्धांतिक मांडणी करण्यात आली तशी जोशी इफेक्टची केली गेली नाही. सीआयआरआयच्या माध्यमातून त्यांच्या संशोधनाला पुढे नेण्याचे काम सुरू असून त्यासाठी २०११मध्ये डॉ. वाघ यांनी एक परिषदही घेतल्याची माहिती दिली.