मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या धनगर आरक्षणावर वेगवेळ्या भूमिका आहेत. महात्मे यांच्या आरक्षणावरील भूमिकेला भाजपच्या एकाही आमदार आणि खासदारांचे समर्थन नाही. असे असतानाही महात्मे केवळ मतांच्या राजकारणासाठी समाजाची फसवणूक करीत आहेत, असा आरोप धनगर विवेक जागृती अभियानचे संयोजक विक्रम ढोणे यांनी आज गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

ढोणे म्हणाले, भाजपने २०१४ च्या निवडणुकीत धनगर आरक्षणाचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर आरक्षणाचा निर्णय ‘टीस’ अभ्यासाअंती घेण्यात येईल, असे सांगून समाजाला ताटकळत ठेवले. समाजाचा रोष कमी करण्यासाठी डॉ. महात्मे यांना राज्यसभेत पाठवले. ‘टीस’ अहवाल केव्हाच आला आहे आणि लोकसभा निवडणूक तर तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. पण, धनगर आरक्षणावर सरकार काहीच बोलत नाही. त्यामुळे समाजात खदखद आहे. म्हणूनच सांगली जिल्ह्य़ातील युवकांनी समाज जागरण अभियान छेडले असून थेट डॉ. महात्मे यांना लक्ष्य केले आहे. डॉ. महात्मे यांनी राष्ट्रपती, गृहमंत्री यांची भेट घेतली, परंतु त्यामुळे आरक्षण मिळणार नाही. मुळात त्यांच्या पक्षातूनच आरक्षणाच्या त्यांच्या भूमिकेला पाठिंबा नाही.

३१ मे २०१६ ला महात्मे खासदार झाले. ते संसदेत गेल्यावर एक-दोनदा प्रश्न मांडण्याशिवाय काही करू शकले नाहीत. महात्मेंच्या खासदारकीमुळे आरक्षणाचा विषय कांकणभरही पुढे गेलेला नाही. त्यांनी समाजाला अंधारात ठेवून खासदारकी मिळवली. समाज आरक्षणाच्या विषयात गुरफटत चालला आहे. मराठवाडय़ात काही आत्महत्याही झाल्या आहेत. त्यामुळे महात्मेंनी सुरू केलेला खेळ स्वत:च बंद करावा, असे आवाहनही ढोणे यांनी केले.