शहरातील सर्वच जलाशयातील पातळी दिवसेंदिवस कमी होत असतानाच, पाण्यातील ऑक्सिजनची मात्राही प्रचंड वेगाने कमी होत असल्याचे एका पाहणी अहवालातून समोर आले आहे. सलग चार वर्षांपासून शहरातील फुटाळा, गांधीसागर, सोनेगाव या तलावातील पाण्याची चाचणी करण्यात येत आहे. या पाहणी अहवालानंतर ही स्थिती अशीच कायम राहिल्यास शहरातील तलाव संपतील, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

अमेरिकेतील जागतिक जल संस्थेच्या (वर्ल्ड वॉटर फाऊंडेशन) वतीने दरवर्षी जगभरातील संपूर्ण देशातील पाण्याची स्थिती दर्शविणारे ‘ईयर बूक’ प्रसिद्ध केले जाते. सर्व देशांमधील काही निवडक शहरातील पाण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना पाण्याची चाचणी करण्याची जबाबदारी सोपवली जाते. या संस्थेने २०१२ मध्ये नागपुरातील पर्यावरणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या ग्रीन विजिल फाऊंडेशनवर ही जबाबदारी सोपवली. सलग चार वर्षांपासून नागपुरातील तलावांचा हा अहवाल या ‘ईयर बूक’ मध्ये प्रकाशित होत आहे. अमेरिकेतील या संस्थेच्यावतीने चार पातळ्यांवर केल्या जाणाऱ्या पाण्याच्या चाचणीसाठी ‘कीट’ दिली जाते. भारतात उपलब्ध यंत्रणा आणि अमेरिकेतील या संस्थेकडे पाण्याची चाचणी करण्यासाठी उपलब्ध असणारी यंत्रणा यात बरीच तफावत आहे. अमेरिकेतील या यंत्रणेच्या माध्यमातून पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण, पाण्याचे तापमान या बाबी अगदी बरोबर तपासल्या जातात. अशा १३ ‘कीट’ ग्रीन विजिल फाऊंडेशनला पाठवण्यात आल्या. त्यानंतर संस्थेच्या संस्थापक डॉ. कविता रतन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरभी जयस्वाल व तिच्या सहकाऱ्यांनी शहरातील या प्रमुख जलाशयांमधील पाण्याची चाचणी करण्यास सुरुवात केली. या प्रमुख तीन जलाशयांमध्ये गणेश मूर्ती आणि देवी मूर्तीचे मोठय़ा प्रमाणावर विसर्जन केले जाते. त्यामुळे विसर्जनाच्या आधी जुलै तसेच विसर्जनानंतर ऑक्टोबरमध्ये आणि डिसेंबर महिन्यात पाण्याची चाचणी केली जाते.

गणपती आणि देवी विसर्जनानंतर या तलावांमधील पाण्याची ऑक्सिजनची मात्रा तसेच इतरही घटक मोठय़ा प्रमाणावर कमी होत असल्याचे निदर्शनास आले. हवेतील ऑक्सिजन तलावातील पाण्यात ओढून घेण्यासाठी लावले जाणारे कृत्रिम यंत्र आपल्याकडे नाही. सौंदर्यीकरणासाठी लावल्या जाणाऱ्या फवाऱ्यांच्या माध्यमातून काही प्रमाणावर हवेतील ऑक्सिजन तलावातील पाण्यात ओढले जात असले तरीही ते पुरेसे नाही. मूर्ती, निर्माल्य विसर्जनामुळे हे दुष्परिणाम समोर येत आहेत. त्यावर प्रतिबंध न घातल्यास शहरातील तलाव लवकरच संपतील, असा इशाराही ग्रीन विजिल संस्थेचे कौस्तुभ चटर्जी यांनी दिला आहे.

पाण्यात ऑक्सिजनची मात्रा किमान ६ मिलिग्राम असायला हवी असे असताना जुलै २०१५ मध्ये फुटाळा तलावातील पाण्यात ऑक्सिजनची मात्रा ३.५ मिलिग्राम, ऑक्टोबर २०१५ मध्ये २.५ मिलिग्राम आणि डिसेंबर २०१५ मध्ये ४.० इतकी होती. सोनेगाव तलावातील पाण्यात जुलै २०१५ मध्ये ५.० मिलिग्राम, ऑक्टोबर २०१५ मध्ये ५ मिलिग्राम आणि डिसेंबर २०१५ मध्ये ५ मिलिग्राम इतकी आढळली. गांधीसागर तलावातील पाण्यात ऑक्सिजनची मात्रा जुलै २०१५ मध्ये ४.५ मिलिग्राम, ऑक्टोबर २०१५ मध्ये ३.० मिलिग्राम आणि डिसेंबर २०१५ मध्ये ४.५ मिलिग्राम इतकी ऑक्सिजनची मात्रा होती.