करोनाच्या मार्गदर्शक सूचनांचा नागरिकांना फटका

चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

नागपूर : सरकारी काम आणि बारा महिने थांब असे सरकारी कामकाजाबाबत बोलले जाते. आतापर्यंत आपल्या कामाचे काय झाले हे विचारण्यासाठी सर्वसामान्यांना कार्यालयात खेटे तरी घालता येत होते. आता करोना संसर्गाच्या भीतीपोटी त्यांच्या कार्यालयीन प्रवेशावरच निर्बंध घालण्यात आले आहे.

करोना साथ काळात सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कमीत कमी अभ्यागतांना प्रवेश द्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या सूचना जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका कार्यालयांसाठीही लागू आहेत.

वरील कार्यालयात रोज शेकडो नागरिक त्यांच्या कामासाठी रोज खेटा घालतात. विविध प्रकारच्या सरकारी योजनाचा लाभ असो, धरणग्रस्तांचा मोबदला असो, नागरी सुविधांच्या समस्या असो किंवा आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त करण्याचे काम असो. दररोज कार्यालय बाहेरच्या लोकांनी फुलून गेलेले असते. मात्र सध्या करोनाची साथ सुरू आहे आणि या काळात टप्प्याटप्प्याने सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवण्याचे सरकारचे धोरण आहे. सध्या लालक्षेत्रातील कार्यालयात दहा टक्के तर इतर ठिकाणी पन्नास टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक आहे. अशा अवस्थेत कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना ३० मे रोजी जारी केल्या आहेत. त्यात कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेताना ज्यांच्यासाठी हे कार्यालय काम करते. त्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र कार्यालयात प्रवेशच करता येऊ नये याकडे यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कमीत कमी अभ्यागतांना प्रवेश द्यावा, गरज असेल तरच त्यांना प्रवेश देताना त्यांच्या तापमानाची नोंद करावी व नंतरच त्यांना आत सोडावे, विशिष्ट अंतर ठेवूनच त्यांच्याशी संवाद साधावा, असे नमूद करण्यात आले आहे. महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये लोकप्रतिनिधींच्या कक्षात त्यांना भेटण्यासाठी रोज अनेक लोक येतात. यात कार्यकर्त्यांचीही संख्या अधिक असते. आता या सर्वांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना भेटण्याची वेळ आणि दिवस निश्चित करण्यात आले आहे. मात्र पुढच्या काळात लोकप्रतिनिधींना व अधिकाऱ्यांनाही लोकांपासून दूरच राहावे लागण्याची शक्यता आहे.

दाटीवाटीने बसणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आता तीन फुटाचे अंतर ठेवावे लागणार आहे. त्यासाठी आसन व्यवस्था बदलावी लागेल. एका कारमधून फक्त अधिकारीच प्रवास करू शकतील. त्यांना फाईल्सही शिपायाच्या हातून पाठवता येणार नाही. त्यासाठी ई-मेलचा वापर करावा लागणार आहे.

संगणक, प्रिंटर तीन वेळा पुसा

कार्यालयातील लिफ्ट बटण, टेबल खुर्च्या, संगणक, प्रिंटर, स्कॅनर व इतर उपकरणे दिवसातून तीनवेळा स्वच्छ करायची आहेत. विशेष म्हणजे हात धुण्यासाठी वापरण्यात येणारी साबणही तीनवेळा धुवावी लागणार आहे. मुळात कार्यालयात शिपायांची संख्या कमी आहे. स्वच्छतेचे काम खासगी तत्त्वावर केले जाते, अशा परिस्थितीत या सूचनांचे पालन कसे करावे, हा प्रश्न आता कार्यालयांना पडणार आहे.