सरसंघचालकांच्या वक्तव्यावर निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया

देशाला गरज पडल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सीमेवर शत्रूशी लढेल आणि त्यासाठी केवळ तीन दिवसात सैन्याची उभारणी करेल. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरून माजी सैन्य अधिकाऱ्यांतून टीका केली जात आहे. ज्यांना लष्काराची माहिती नाही, अशा लोकांच्या वायफळ वक्तव्याकडे दुर्लक्ष करून त्यांना त्यांच्या जगात जगू द्यावे, अशी प्रतिक्रिया निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांमध्ये उमटली आहे.

मोहन भागवत यांनी मुजफ्फरपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना लष्कराला तयारीसाठी सहा ते सात महिने लागतात, संघ तीन दिवसात सैन्याची उभारणी करेल, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून देशभर गदारोळ उडाला आहे. सरसंघचालकांनी व्यक्त केलेले मत लष्करांचे मनोबल कमी करणारे असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. विशेष म्हणजे, लष्करात अनेक वर्षे घालवलेल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही भागवत यांच्या वक्तव्याविरुद्ध थेट नव्हे, पण अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. संघाचे मुख्यालय नागपुरात आहे. येथील निवृत्त लष्करी अधिकारी आणि स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची मते लोकसत्ताने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नाराजी व्यक्त केली.

हेतू समजून घ्यावा लागेल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिस्तबद्ध संघटना आहे. त्यांचे स्वयंसेवक राष्ट्रभक्ती प्रेरित आहे. त्यांच्यात त्यागाची भावना आहे, परंतु स्पीरीडेट असणे वेगळे आहे. ते देशसेवेसाठी कुठेही जायला तयार आहेत. असे म्हणणे ठीक आहे, परंतु लढण्यासाठी तयार होते, असे म्हणणे अतिशयोक्ती असते. मोठे व्यक्ती विचार करून बोलतात. त्यांचा अर्थ समजणे महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांच्या असे बोलण्याचा नेमका हेतू काय होता, हे समजून घ्यावे लागेल.

      – एअर मार्शल पी.पी. खांडेकर

तीन दिवसात सैन्य अशक्य

कामठी येथे गार्ड रेजिमेंट आहे. तेथे ११ महिन्यांचे प्रशिक्षण दिल्यानंतर सैनिक तयार होत असतात. सैनिकांच्या तुकडय़ांनाही हालचाली करण्यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी लागतो. तेव्हा स्वयंसेवकांना तीन दिवसात सैन्य म्हणून उभे करू असे म्हणणे चुकीचे आहे. लष्कराला मदत करण्यासाठी स्वयंसेवक तीन दिवसात सज्ज केले जाऊ शकते, असे म्हटले असते तर ते एकादाचे मान्य झाले असते, परंतु थेट लढाईसाठी तीन दिवसात सज्ज होणे शक्य नाही.

      – कर्नल अभय पटवर्धन

लष्कराचे मनोबल खच्चीकरणाचा प्रयत्न

आमचे लष्कर जगात सक्षम आहे. दूरदृष्टी ठेवूनच या दलाची रचना करण्यात आली आहे. लष्कराची त्रिस्तरीय रचना असल्याने बंड होण्याची शक्यता नाही. मोहन भागवत सरसंघचालक आहेत व त्यांची राजकीय शाखा असलेल्या भाजपचे केंद्रात सरकार आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या व्यक्तीने असे बोलणे म्हणजे सैनिकांना कमी लेखण्यासारखे आहे. त्यांच्या जाहीर वक्तव्याने नागरिकांचे सैन्याप्रती आणि सैनिकांच्या नागरिकाप्रती भावना विचलित होतात. अशा प्रकारच्या वक्तव्याने सैनिकांचे मनोबल खचत असते हे समजून घ्यायला हवे. वयाची समृद्धी लाभलेल्या लोकांनी अशाप्रकारे बोलल्यास चिंता वाटते.’

      – लीलाताई चितळे,, ज्येष्ठ गांधीवादी

 

त्यांना त्यांच्या जगात राहू द्या!

जे लष्कराबाबत विचार न करता बोलतात, त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रया नको. ज्यांना लष्कारची माहिती नाही आणि तरीही बोलत सुटतात, अशांना आम्ही सैनिक प्रतिक्रिया देत नाहीत. जर वैद्यकीय क्षेत्राची कल्पना नसेल तर औषधोपचावर बोलणे चुकीचे आहे. लोकांचा आपापला दृष्टिकोन असतो. ज्यांना जेवढे कळते, समजते त्यावर त्यांचा दृष्टिकोन बनलेला असतो. अशा लोकांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देऊन त्यांचा सन्मान वाढवू नये. त्यांना त्यांच्या जगात जगू द्यावे. सैनिक बनणारे सर्वसाधारण नसतात. त्यांना जिंकण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यांना आदेशाचे पालन करण्यासाठी शिस्तीचे धडे दिले जातात. सैनिक अनेक वर्षांच्या तयारीनंतर तयार होतो. तीन दिवसात सैनिक होणे अशक्य आहे.

      – कमांडर एस. नाथन,