नागपुरातील निवृत्त अधिकाऱ्यांचे मत

नागपूर : पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने हल्ला करून पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ले नष्ट केले. पाकिस्तान दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतात कुरापती  करत होता. परंतु  भारताने हवाई दलाचा वापर अतिशय योजनाबद्ध पद्धतीने करून पाकिस्तानाला चांगलाच धडा शिकवला, असे सांगून हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्यांनी ही कारवाई आवश्यक होती, असे मत व्यक्त केले.                                        धाडसी निर्णय घेऊन तो केला गेला. त्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. आता प्रतिउत्तर दिले जाऊ शकते, या भीतीने पाकिस्तान कुरापती करताना दहादा विचार करेल, अशी प्रतिक्रिया एअर वाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी व्यक्त केली.

हवाई दलाच्या कारवाईमुळे युद्धाची भीती असते. त्यामुळे भारताने दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्यदलाचा वापर करून अनेक वेळा प्रतिउत्तर दिले आहे. मात्र, यावेळी गुप्तचर यंत्रणेचा योग्य वापर करत हवाई हल्ला केला. हा एक सांकेतिक विजय आहे. ज्या भागातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. तो भाग पहाडांचा आहे. शिवाय रात्री अंधारात ही कारवाई करायची होती. त्यामुळे कौशल्याची आवश्यकता होती. भारतीय हवाई दलाच्या योद्धय़ाने अतिशय काटेकोर नियोजन करून कारवाई पूर्ण केली. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. १२ युद्ध विमानाने हा हल्ला केला असला तरी तेवढेच विमान विविध कामांसाठी कर्तव्यावर होते. त्यामध्ये शूत्र देशाचे रडार निकामी करणे आदींचा समावेश आहे. आजच्या घडीला सीमारेषेवरील हवाई तळावरून अटक करण्याची आवश्यकता आहे. भारताकडे आकाशातल्या आकाशात इंधन भरण्याची क्षमता आहे. त्यामुळे देशात कुठूनही युद्ध विमान उड्डाण करून शत्रूला नमवू शकतो, असेही चाफेकर म्हणाले.

भारताने पुलवामा हल्ल्यानंतर जगाचे मत आपल्या बाजूने तयार केले. त्यानंतर हवाई दलाने कारवाईचे नियोजन केले. भारत सरकारने योग्यवेळी योग्य निर्णय घेतला आणि पाकिस्तानचे मनोबल खचवण्यात यश प्राप्त केले. ही हवाई सर्जिकल स्ट्राईक होती. अशाप्रकारच्या हल्ल्यात आजूबाजूला हानी होत नाही. मिराज विमानाद्वारे बॉम्ब टाकण्यात आले. हवाई दल युद्धासाठी सज्ज असतो, परंतु प्रत्यक्षात हल्ल्याच्या चोवीस तास आधी निर्णय होतो. आजच्या काळात उपग्रहाच्या छायाचित्रामुळे कोणत्या देशात किती विमाने, किती शस्त्रास्त्रे आहेत हे सगळ्यांना माहिती असते. परंतु अशा हल्ल्यात वेळ, स्थळ आणि उद्देश हे महत्त्वाचे असते. या सगळ्यांच्या नियोजानामुळे  केवळ २१ मिनिटांत भारतीय हवाई दलाने लक्ष्य भेदून कारवाई पूर्ण केली, असे विंग कमांडर अशोक मोटे (निवृत्त) म्हणाले.