महेश बोकडे

करोनाचा आर्थिक फटका परिवहन खात्यालाही बसला आहे. या खात्याच्या राज्यातील ५० प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ)  भरारी पथकांचा महसूल निर्धारित लक्ष्याच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी गोळा झाला आहे. सर्वाधिक फटका मुंबई परिसरातील चार कार्यालयांतील पथकांना बसला असून तेथे गेल्यावर्षीच्या तुलनेत ८१.५१ टक्क्यांनी महसूल घटला आहे.

राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांतील भरारी पथकांसाठी चालू वर्षांकरिता १६८ कोटी ६३ लाखांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. परंतु सगळ्यांना नोव्हेंबपर्यंत ३९ कोटी ९७ लाख २४ हजार रुपयांपर्यंतच मजल मारता आली. एप्रिल २०१९ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत या पथकांकडून परिवहन खात्याला ८२ कोटी ४५ लाख ५ हजार रुपयांचा महसूल मिळाला होता. परंतु २०२० मध्ये या कालावधीत केवळ ३९ कोटी ९७ लाख २४ हजारांचाच महसूल मिळाला . हा महसूल गेल्यावर्षीच्या तुलनेत ५१.५२ टक्क्यांनी कमी आहे. यातील सर्वात वाईट कामगिरी मुंबईची आहे.

मुंबई मध्य आरटीओतील भरारी पथकांचा महसूल गेल्यावर्षीच्या तुलनेत ६४.२२ टक्के, पश्चिम ८१.३९ टक्के, पूर्व ८७.४९ टक्के, बोरीवली ८८.७४ टक्के असे एकूण चारही कार्यालय मिळून सरासरी ८१.५१ टक्क्यांनी घसरला तर  ठाणे, कल्याण, वाशी, वसई या चार कार्यालयातील महसूल ५३.८१ टक्क्यांनी कमी होता. पनवेल, पेन, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या चार कार्यालयांचा महसूल ७०.१८ टक्क्यांनी घसरला. कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड या चार कार्यालयाचा महसूल ६.६३ टक्क्यांनी कमी झाला. पुणे, सोलापूर, पिंपरी चिंचवड, बारामती, अकलूज या पाच कार्यालयातील महसूल ४१.४८ टक्क्यांनी घसरला. नाशिक, अहमदनगर, श्रीरामपूर, मालेगाव या चार कार्यालयातील महसूल ४८.५५ टक्क्यांनी कमी झाला. धूळे, नंदूरबार, जळगाव या तीन कार्यालयातील महसूल ५६.७७ टक्क्यांनी घसरला. औरंगाबाद, जालना, बिड या तीन कार्यालयातील महसूल ७०.४१ टक्क्यांनी घसरला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली या तीन कार्यालयातील महसूल ५७.७ टक्क्यांनी कमी झाला. लातूर, उस्मानाबाद, अंबेजोगाई या तीन कार्यालयातील महसूल ३०.९५ टक्क्यांनी घसरला. अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशिम या पाच कार्यालयातील महसूल ४३.३१ टक्क्यांनी कमी झाला. नागपूर शहर, नागपूर (ईस्ट), वर्धा कार्यालयाचा महसूल ३४.९९ टक्क्यांनी घसरला. नागपूर ग्रामीण, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या पाच कार्यालयाचा महसूल ४६.३५ टक्क्यांनी कमी झाला आहे. या विषयावर परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. परंतु दुसऱ्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर महसूल ५० टक्यांहून अधिक घटल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

महसूल स्थिती

(कालावधी-एप्रिल ते नोव्हेंबर ) (आकडे लाखांत)

 

जिल्हे                           २०१९             २०२०            टक्के

 

मुंबई (मध्य)             ९०.५७            ३२.४१           ६४.४१

मुंबई (पश्चिम)        ४०६.६०          ७५.६७          ८१.३९

मुंबई (पूर्व)               २२२.८५          २७.८८          ८७.४९

बोरीवली                       ३९.०७              ४.४            ८८.७४

पेण                             ३८७.३७            ६५.२६        ८३.१५

औरंगाबाद                २३३.८०              ५३.८          ७६.९९

गडचिरोली                  ९१.९०              २०.१९        ७८.०३

नागपूर (श.)           १८३.२५             ६५.९३       ६४.०२

नागपूर (ग्रा.)           १८२.४४          १३६.७७     २५.०३