सत्तापक्षाच्या अभिनंदन प्रस्तावावर विरोधकांचा आक्षेप; केंद्र सरकारचा निषेध करीत सभात्याग

सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत आज शुक्रवारी  महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्तापक्षाने सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणला. या प्रस्तावाला विरोधी पक्षाने विरोध केला. यावरून सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. या गोंधळातच घोषणा देत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच भाजपचे सदस्य वीरेंद्र कुकरेजा यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. निगम सचिव व प्रभारी आयुक्त राजेश मोहिते सभागृहात तो वाचत असताना काँग्रेसचे सदस्य प्रफुल्ल गुडधे यांनी या प्रस्तावाला विरोध केला. देशातील विविध राज्यात या कायद्याला विरोध होत असताना आणि प्रकरण न्यायालयात असताना अभिनंदनाचा प्रस्ताव कसा सभागृहात ठेवण्यात आला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस, बसपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी घोषणा देणे सुरू केले. भाजपचे ज्येष्ठ सदस्य प्रवीण दटके आणि वीरेंद्र कुकरेजा यांनी विरोधकांना प्रतिउत्तर दिले. मात्र विरोधक घोषणा देत महापौरांच्या आसनासमोर आले. सत्तापक्षाचे सदस्यही ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत समोर आले. अखेर  विरोधकांनी या कायद्याचा निषेध करत सभात्याग केला.

सलग दुसऱ्या दिवशी मुस्लीम संघटनांचे आंदोलन

नागरिकत्व सुधारणा कायदा व एनआरसीला विरोध करण्यासाठी आज सलग दुसऱ्या दिवशी मुस्लीम संघटनांनी विधिमंडळावर मोर्चा काढून  केंद्र सरकारचा निषेध केला.  या मोर्चात शहरातील विविध भागातील मुस्लीम बांधव व संघटना सहभागी झाल्या होत्या. चिटणीस पार्क सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू वरून मोर्चाला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा लोक चालत होते. त्यामुळे या भागातील वाहतूक तीन तास बंद करण्यात आली होती.

मुफ्ती मुजीब अशरफ यांच्यासह विविध मुस्लीम धर्मगुरूंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. दुपारी नमाज अदा केल्यानंतर चिटणीस पार्क येथून ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी शहरातील विविध भागातून मुस्लीम बांधवांसह इतर संघटना उत्स्फूर्तपणे आंदोलनात

सहभागी झाल्या. कुठल्याही राजकीय पक्षाचे बॅनर किंवा फलक घेऊन सहभागी होऊ नये, अशी सूचना करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांच्या हातामध्ये केवळ राष्ट्रध्वज दिसत होते. या मोर्चाला भीम पँथर, शेतकरी संघटना, बहुजन संघर्ष, जमात उलेमा हिंद, जमात ए इस्लामी या संघटनांनी  पाठिंबा दिला  होता.

या मोर्चाच्या मार्गावर व एलआयसी चौकात मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चा एलआयसी चौकात आल्यावर विविध नेत्यांची भाषणे झाली. आमदार विद्या चव्हाण यांच्यासह पक्षाचे इतर आमदार मोर्चाला सामोरे गेले.

महापालिकेतही ‘मी सावरकर’

राहुल गांधी यांनी काही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी महापालिकेत भाजपचे सर्व सदस्य ‘मी सावरकर’ लिहिलेल्या टोप्या घालून सभागृहात आले व त्यांनी राहुल गांधी यांचा निषेध केला.

महाराष्ट्रात हा कायदा लागू होणार की नाही, याबाबत अजून निर्णय झाला नाही. त्यामुळे सभागृहात या अभिनंदन प्रस्तावाला विरोध केला. हा अभिनंदन प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी केली. मात्र सत्तापक्षाचा मनमानी कारभार सुरू आहे. आता रस्त्यावर येऊन या कायद्याचा विरोध करणार आहे. – प्रफुल्ल गुडधे,  ज्येष्ठ सदस्य, काँग्रेस.

लोकसभा व राज्यसभेत हा कायदा मंजूर झाल्यामुळे सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला. मात्र विरोधकांना या विषयावर राजकारण करायचे होते. त्यांनी गोंधळ घातला.  विरोधाला विरोध ही विरोधी पक्षाची भूमिकाच आहे.  – वीरेंद्र कुकरेजा,  ज्येष्ठ सदस्य, भाजप.