03 August 2020

News Flash

वन्यप्राण्यांच्या बेशुद्धीकरणाचे अधिकार केवळ पशुवैद्यकांनाच

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वात सुधारणा

संग्रहित छायाचित्र

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील ‘टी-१’ वाघिणीचे  बेशुद्धीकरण आणि तिला ठार मारण्याच्या प्रक्रियेवरून वादळ उठले होते. त्यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या  मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्याची मागणी झाली होती. ११ नोव्हेंबरला जाहीर झालेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार वन्यप्राण्यांचे बेशुद्धीकरण आणि ‘मॅन इटर’ म्हणून जाहीर झाल्यास प्राण्याला ठार करण्याचे अधिकार विभागातीलच पशुवैद्यक, नेमबाजांनाच असणार आहेत.

मानव-वन्यजीव संघर्षांत वन्यप्राण्यांना पकडण्यासाठी किंवा त्याला ‘मॅन इटर’ म्हणून घोषित केल्यानंतर वनखात्याकडे तज्ज्ञ व अनुभवी पशुवैद्यक तसेच नेमबाज असतानासुद्धा अनेकदा बाहेरच्या पशुवैद्यक आणि नेमबाजांना पाचारण करण्यात येत होते. वर्षभरापूर्वी पांढरकवडा येथे ‘टी-१’ वाघिणीच्या प्रकरणात वनखात्याने खात्यातील तज्ज्ञ पशुवैद्यक आणि नेमबाजांपेक्षा नवाबसारख्या शिकाऱ्यावर विश्वास दाखवला. वाघीण पकडण्यात खात्यातील पशुवैद्यक यशस्वी ठरत असतानाच नवाबचा मुलगा असगर याने तिला ठार केले. वन्यप्राणी, गर्भवती मादी, वन्यप्राण्याचा स्वभाव, हिंस्रपणा, वय, संघर्षांचे ठिकाण आदी बाबी तपासून बेशुद्धीकरण औषधांचे प्रमाण ठरवावे लागते. प्राधिकरणाच्या आधीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये याबाबतचा एक सर्वसामान्य सूचना होती. मात्र, नवाबसारखे शिकारी आणि नेमबाज अशाच त्रुटींचा आधार घेत कार्य साधत होते. त्यामुळे नियमात सुधारणा करण्याची मागणी तज्ज्ञ पशुवैद्यकांनी केली होती.

११ नोव्हेंबरला सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. सुधारणांमुळे वन्यजीवांचे विषय वैज्ञानिकरित्या हाताळता येतील व तांत्रिक व्यवस्थापनात मदत मिळेल.

* संघर्षांच्या ठिकाणी वन्यजीव व्यवस्थापक, जीवशास्त्रज्ञ (उपलब्ध असल्यास) आणि वन्यप्राण्यांना बेशुद्ध करण्यास तज्ज्ञ  पशुवैद्यक असे पथक राहील.

* बेशुद्धीकरणासाठी ‘ट्रँक्विलाईज गन’मध्ये किती औषध भरायचे याचा निर्णय परिस्थिती पाहून तज्ज्ञ पशुवैद्यक घेईल.

*  वन्यप्राण्याला ‘मॅनइटर’ म्हणून घोषित केल्यानंतर विभागातीलच नेमबाज निशाणा साधेल.

*  विभागातीलच तज्ज्ञ, अनुभवी पशुवैद्यकांना वन्यप्राणी बेशुद्ध करण्याचे अधिकार राहतील.

सुधारित मार्गदर्शक सूचनांमुळे संपूर्ण परिस्थिती वैज्ञानिकरित्या हाताळता येईल व अधिक वन्यजीव वाचवता येतील. तसेच तज्ज्ञ पशुवैद्यक, नेमबाजांवर जबाबदारी सोपवल्यामुळे ते अधिक सशक्त होतील. नवाबसारख्या बाहेरच्या शिकाऱ्यांना किंवा नेमबाजांना बोलावण्याची गरज राहणार नाही. कारण अशा व्यक्ती वन्यप्राण्यांना बेशुद्ध करून पकडण्यासाठी म्हणून येतात आणि त्यांना ठार करतात.

– डॉ. प्रयाग, कार्यकारी समिती सदस्य व सदस्य वन्यजीव पशुवैद्यक संस्था

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 12:55 am

Web Title: revision of national tiger conservation authority guidelines abn 97
Next Stories
1 लोकजागर : ‘वंचित’ची वंचना!
2 उघडय़ावरील आयुष्याला शिक्षणाचे संस्कार
3 वेगवेगळय़ा घटनांत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराने संताप
Just Now!
X