19 October 2019

News Flash

नदी स्वच्छता अभियान लोकचळवळ व्हायला हवी

लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांनी नागनदीच्या स्वच्छतेचा प्रवास उलगडला.

प्रा. अनिल सोले

आमदार प्रा. अनिल सोले यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

कोणतेही अभियान राबवताना हे माझे अभियान आहे, ही भावना मनात यायला हवी. माझे घर, माझे शहर असे जेव्हा लोक म्हणतात तेव्हा ही माझी नदी, तिच्या स्वच्छतेची जबाबदारी माझीही, असे त्यांनी म्हणायला हवे. तरच या अभियानाला खऱ्या अर्थाने बळ येईल, असे मत माजी महापौर व आमदार प्रा. अनिल सोले यांनी व्यक्त केले. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांनी नागनदीच्या स्वच्छतेचा प्रवास उलगडला.

प्रा.  सोले  म्हणाले, लोकसहभाग हे कोणत्याही अभियानाचे शक्तिस्थान आहे. त्यामुळे नागनदी स्वच्छतेची मोहीम महापालिका हातात घेत असताना लोकसहभाग तितकाच आवश्यक आहे. हे शहर लोकांचे आहे, त्याअर्थी या शहराची मालकी देखील लोकांची आहे. लोकांनी स्वत:हून या अभियानात सहभाग घेणे अपेक्षित आहे. २०१३ मध्ये माझ्या कार्यकाळात फक्त नागनदी स्वच्छता अभियान आम्ही हाती घेतले. त्यावेळी तब्बल ५३ मॅराथॉन बैठका घेतल्या. कारण त्यात लोकांना जोडून घेणे आवश्यक होते. महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांपासून तर विविध दैनिकांच्या संपादकांपर्यंत सर्वाशी या मोहिमेबाबत चर्चा केली. त्यांच्याकडून मिळणाऱ्या सूचनांचा विचार केला आणि मग मोहिमेला सुरुवात केली. नदी स्वच्छतेसाठी १७ किलोमीटरच्या मानवी साखळीत १७ हजार लोक सहभागी झाले आणि यशाचा पहिला टप्पा त्यावेळी पार केला. वास्तविक या पहिल्या अभियानातून खूप काही साध्य केले असे नाही, पण ही नदी माझी जबाबदारी अशी जनभावना निर्माण झाली. १२७ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार केला आणि त्यानुसार काम सुरू केले. नदी स्वच्छतेतील मुख्य अडसर नदीत येऊन मिसळणाऱ्या सांडपाण्याचा आहे. जोपर्यंत नद्यांमध्ये येणारे सांडपाणी आणि यात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर उपाय सापडत नाही, तोपर्यंत नदी स्वच्छतेत अडसर हा येणारच आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यावर पर्याय शोधला आहे. सुमारे १४०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. जगभरात नदी स्वच्छतेच्या झालेल्या प्रयोगाच्या आधारावरच हा आराखडा तयार करण्यात आला आहे. विकेंद्रीत सांडपाणी प्रक्रिया केंद्रामुळे सांडपाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटू शकतो. नद्यांच्या काठावर असणाऱ्या झोपडपट्टय़ा, त्याठिकाणी तयार झालेली वस्ती यातूनही नदी खराब होत आहे. कारण या वस्त्यांमधील सांडपाणी, कचरा हा सर्व या नद्यांमध्ये जात आहे. नदीकडे पाठमोरी असणारी ही वस्ती आहे. तेच जर वस्त्यांचा चेहरा नदीकडे असता तर कदाचित यात फरक पडला असता. यावरही पर्याय नक्कीच शोधण्यात येईल. भावनिकरित्या या विषयाशी लोक जोपर्यंत जुळणार नाहीत, तोपर्यंत अपेक्षित काम होणे शक्य नाही. गेल्या सात वर्षांत बरेच काम झाले आहे. आधी नदी स्वच्छच होत नव्हती, आता ते काम होत आहे. शहरभर जमा होणारे पाणी आता थांबले आहे. नदी हा विषय क्रियाप्रतिक्रियांचा झाला आहे. तो सर्वाच्याच अजेंडय़ावर आला आहे. या नव्या आराखडय़ामुळे शहरातील नद्या स्वच्छ होतीलच आणि त्यामुळे शहराचे रूप देखील पालटेल, असा आशावाद आमदार प्रा. अनिल सोले यांनी व्यक्त केला.

अधिकाऱ्याची भावनिक बांधीलकी

नदी स्वच्छता अभियानाची सुरुवात केल्यानंतर आम्ही प्रसारमाध्यमांना केलेले काम दाखवणार होतो. एका भागात स्वच्छ झालेल्या नदीत असलेला सिमेंटचा खांब तुटला आणि जलपर्णी वनस्पती या स्वच्छ झालेल्या पाण्यातून वाहू लागली. प्रसारमाध्यमांना आता काय दाखवणार, असा प्रश्न महापालिकेतील एका अधिकाऱ्याला पडला. त्यावेळी मी त्याला धीर दिला आणि पत्रकार परिषद होईस्तोवर हा गाळ वाहून जाईल, असे सांगितले. ही त्या अधिकाऱ्याची नदी स्वच्छतेविषयीची भावनिक बांधीलकी होती.

First Published on May 11, 2019 12:17 am

Web Title: river cleanliness campaign should be started